(रत्नागिरी / वैभव पवार)
कोकण मराठी साहित्य परिषदचे केंद्रीय कार्यवाह तसेच महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्याख्याते माधव अंकलगे यांच्या मातोश्री रत्नाबाई विश्वनाथ अंकलगे यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने अंकलगे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
रत्नाबाई अंकलगे यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी आणि शेतीसाठी अथक परिश्रम घेतले. प्रेमळ स्वभाव, कष्टाळूपणा आणि कुटुंबवत्सल वृत्तीमुळे त्या परिसरात परिचित होत्या. त्यांच्या गळ्याजवळ जन्मजात असलेली गाठ काही महिन्यांपूर्वी दुखू लागल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. गेल्या सहा महिन्यांपासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या. मात्र शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्यावर आज सकाळी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती विश्वनाथ अंकलगे, मुलगे दिगंबर व माधव अंकलगे, बहिणी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माधव अंकलगे व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात रत्नागिरी जिल्ह्यातील मित्रपरिवार, साहित्यिक, हितचिंतक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले असून, ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

