( रत्नागिरी )
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षकांना अद्ययावत अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कुलगुरू डॉ. संजय भावे, कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वरवडेकर तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आला.
दि. २२ जून रोजी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डायटचे प्राचार्य सुशील शिवलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता राहुल बर्वे, अधिव्याख्याता डॉ. लहू आचारेकर, केंद्रप्रमुख अमर घाटगे तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. केतन चौधरी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणातील ज्ञानाधारित, कौशल्याधारित आणि अनुभवाधारित शिक्षण पद्धतींचे महत्त्व विशद केले. तर सुशील शिवलकर यांनी नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतील विविध टप्प्यांची सविस्तर माहिती दिली.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी यांच्या वतीने इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या शिक्षकांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सुमारे ८४ शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.
प्रशिक्षणासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथील परिषद दालन, वर्गखोल्या, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. काही प्रशिक्षणार्थींची निवास व्यवस्था मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथे करण्यात आली होती. आधुनिक शैक्षणिक वातावरणात प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची सखोल माहिती मिळून अध्यापन अधिक परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. तसेच मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनाच्या शैक्षणिक व पायाभूत सुविधांची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचून संस्थेच्या कार्याचा व्यापक प्रसार होण्यास हातभार लागणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील विविध संस्थांमधील समन्वय दृढ करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

