(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक नाणेघाट बुद्ध लेणी येथे दान पारमिता फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बुद्ध लेणी अभ्यास कार्यशाळेत रत्नागिरी जिल्ह्यातील पाली भाषा, धम्मलिपी आणि बुद्धकालीन इतिहासाचे अभ्यासकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या अभ्यास दौऱ्यात पाली भाषा व धम्मलिपी अभ्यासक प्रमुख शिक्षक प्रा. दिलीप वामनराव वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय जाधव, एन. बी. कदम, संजय आयरे, विजय कांबळे, अरुणकुमार मोरे, तानाजी कांबळे यांच्यासह उपासक-उपासिका अशोक कांबळे, प्रथम पवार, विराज यादव, दीपिका वासनिक, शुभांगी कांबळे, सुप्रिया आयरे आणि लाली पवार यांनी सहभाग घेतला. कार्यशाळेदरम्यान पाली भाषा, लेणी आणि धम्मलिपीचे अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी नाणेघाट येथील शिलालेखांचा इतिहास अभ्यासपूर्ण, संशोधनाधिष्ठित आणि सोप्या भाषेत उलगडून सांगितला. बुद्ध धम्माचा वैभवशाली इतिहास, पूर्वजांनी जतन केलेला सांस्कृतिक वारसा आणि शिलालेखांमधील ऐतिहासिक संदर्भ यांचे त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यामुळे उपस्थित अभ्यासकांना बुद्धकालीन इतिहास नव्या दृष्टीकोनातून समजून घेण्याची संधी मिळाली.
यावेळी सुनील खरे आणि संतोष अंभोरे यांनी लेणी संवर्धन, धम्मप्रसार आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी निःस्वार्थपणे सुरू असलेल्या कार्याची माहिती देत अभ्यासकांना प्रेरित केले. त्यांच्या विचारांतून लेणी आणि धम्माविषयीची निष्ठा व संवर्धनाची तळमळ स्पष्टपणे जाणवली. कार्यशाळेतील विशेष आकर्षण म्हणजे सम्राट अशोककालीन पाली भाषेतील धम्मलिपीत दगडावर कोरलेल्या शिलालेखांचे प्रत्यक्ष वाचन. या उपक्रमामुळे बुद्धकालीन इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ अभ्यासकांसमोर उलगडले.
या अभ्यास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन रुपाली गायकवाड, आकाश हजारे आणि दान पारमिता फाउंडेशन, नाशिक यांनी केले. कार्यशाळेच्या समारोपावेळी उपस्थित अभ्यासकांनी गावागावांत आणि ग्रामीण भागात पाली भाषा, सम्राट अशोककालीन तसेच सातवाहनकालीन धम्मलिपीचा अभ्यास आणि प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले. बुद्धकालीन सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी अशा अभ्यास उपक्रमांची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले आहे.

