(राजापूर / तुषार पाचलकर)
‘मधाचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या राजापूर तालुक्यातील तळवडे येथे पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ‘आरंभ’ व्यसनमुक्ती केंद्र आणि ग्रामपंचायत तळवडे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २६ जुलै) ‘बहावा’ या वृक्षाची तब्बल दोन हजार रोपे लावून हरित संदेश देण्यात आला.
या वृक्षारोपण मोहिमेत तळवडेच्या सरपंच सौ. गायत्री अमित साळवी, ग्रामसेवक मंगेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते अप्पा साळवी, संदीप बारस्कर, चंद्रकांत लिंगायत, पत्रकार सुरेश गुडेकर, ‘आरंभ’ व्यसनमुक्ती केंद्राचे सचिव संतोष परडाकार, अध्यक्ष योगेश गवस तसेच मागील वर्षांमध्ये व्यसनमुक्त झालेल्या शेकडो साधकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष योगेश गवस यांनी सांगितले की, फेब्रुवारी २०२३ मध्ये ‘आरंभ’ व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत या संस्थेने २५० हून अधिक व्यसनाधीन व्यक्तींना व्यसनमुक्त करून नवजीवन दिले आहे. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि त्यांचा परस्परांशी संपर्क कायम राहावा, यासाठी संस्था दर सहा महिन्यांनी स्नेहमिलनाचे आयोजन करते. याच स्नेहमिलनाचे औचित्य साधून यंदा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेण्यात आला.
सध्या ‘आरंभ’ व्यसनमुक्ती केंद्रात २१ रुग्ण उपचार घेत असून, उपचारानंतर त्यांना नव्या आयुष्याची दिशा मिळत असल्याच्या भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केल्या. “येथे आल्यावर सकारात्मक वातावरण मिळते. आम्हाला आयुष्य नव्याने जगण्याची संधी मिळाली,” अशा भावना व्यसनमुक्त साधकांनी व्यक्त केल्या. राजापूरमधील हे व्यसनमुक्ती केंद्र आज राज्यभरात विश्वासार्ह ठरत असून मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर, दापोली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, बांदा तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून व्यसनमुक्तीसाठी रुग्ण येथे उपचारासाठी येत असल्याची माहिती योगेश गवस यांनी दिली.
व्यसनमुक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला. “निरोगी जीवन आणि हरित पर्यावरण” हा दुहेरी संदेश देत तळवड्यातील हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

