(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील जांभ्या (कातळ) जमिनीमुळे शेतीसमोरील वाढत्या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे वळविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि GCF–ECRICC प्रकल्प, कांदळवन कक्ष, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एसआरआय (System of Rice Intensification) पद्धतीने भातशेतीचा अभिनव प्रात्यक्षिक प्रकल्प कोळंबे आणि खेडशी येथे राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत पंधरा दिवसांपूर्वी पेरण्यात आलेल्या भाताच्या रोपांची यशस्वी उगवण झाल्यानंतर नुकताच भातलावणीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमात जिल्ह्यातील शेतकरी, कृषीप्रेमी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आधुनिक शेतीच्या या पद्धतीची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनीही उत्साहाने शेतात उतरून भातलावणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. नव्या पिढीमध्ये शेतीविषयी आत्मीयता निर्माण व्हावी, कृषी संस्कृतीचे जतन व्हावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
एसआरआय पद्धतीची वैशिष्ट्ये
एसआरआय (System of Rice Intensification) ही भात लागवडीची आधुनिक आणि शाश्वत पद्धत मानली जाते. या पद्धतीत एका ठिकाणी अनेक रोपे न लावता एकच कोवळे रोप योग्य अंतरावर लावले जाते. त्यामुळे प्रत्येक रोपाची वाढ जोमदार होते. तसेच शेत कायम पाण्याखाली ठेवण्याची गरज नसून आवश्यक तेवढाच ओलावा राखला जातो. परिणामी पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते.
याशिवाय पारंपरिक पद्धतीतील काही खर्चिक प्रक्रिया टाळता येतात. मजुरी व उत्पादन खर्च कमी होतो, जमिनीचे आरोग्य टिकून राहते आणि उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे रत्नागिरीसारख्या जांभ्या जमिनीच्या भागासाठी ही पद्धत उपयुक्त ठरत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.
या प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीवरील विश्वास वाढविणे, शेतीकडे पुन्हा आकर्षित करणे आणि जिल्ह्यात शाश्वत शेतीला चालना देणे हा प्रमुख उद्देश असल्याचे रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे यांनी सांगितले. भविष्यात हा प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमासाठी हृषीकेश भाटकर (District Coordination Officer), संकेत पवार (Project Associate – Agriculture) आणि सुमित कुळे (Project Associate – Agriculture) यांचे मार्गदर्शन लाभले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटे. माधुरी कळंबटे आणि रोटे. वैभव सरदेसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जिल्हा परिषद सदस्य अॅड. महेंद्र मांडवकर यांनी शेतीसाठी जागा उपलब्ध करून देत या प्रकल्पाला मोलाचे सहकार्य केले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष अॅड. मनिष नलावडे, सचिव आनंद चौगुले, खजिनदार धीरज वेल्हाळ, मेंबरशिप चेअर श्रीकांत भुर्के, फाउंडेशन डायरेक्टर निलेश मुळ्ये, ज्येष्ठ रोटेरियन धरमसीभाई चौहान, विजय पवार, विनायक हातखंबकर, मंदार सावंतदेसाई, प्रमोद कुलकर्णी, रूपेश पेडणेकर, परेश साळवी, रोहित वीरकर, सुरेंद्र यारम यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

