(देवरुख / प्रतिनिधी)
कोंडगाव (साखरपा) येथील सर्वसामान्यांचे सर्वमान्य नेतृत्व आणि गोरगरीबांचे कैवारी म्हणून ओळख असलेले दिवंगत नानासाहेब शेट्ये यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार, १ ऑगस्ट २०२६ रोजी साखरपा येथील ‘नाना’ शेट्ये सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. नानासाहेब शेट्ये स्मारक समितीच्या वतीने हा स्मृतिदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. नानासाहेब शेट्ये स्मारक समिती (ग्रामीण)चे अध्यक्ष दत्ताराम शिंदे हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत, मुंबईतील उद्योजक विष्णूशेठ रामाणे तसेच महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साखरपाचे प्राचार्य विजय बाईग उपस्थित राहणार आहेत.
या स्मृतिदिनानिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील पंचक्रोशीतील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, दहावीतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी, बारावीच्या सर्व शाखांमधील प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमधील प्रथम क्रमांक पटकावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात कै. नानासाहेब शेट्ये स्मृती पुरस्कार २०२६ चे वितरणही करण्यात येणार आहे. यंदाच्या व्यक्ती पुरस्कारासाठी कोट गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच शांताराम आत्माराम (आबा) सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. तर संस्था पुरस्कारासाठी खेड तालुक्यातील ग्राम विकास संघ, कुंभाड (मुंबई) या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
स्मृतिदिन सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिक, कै. नानासाहेब शेट्ये यांचे कुटुंबीय व नातेवाईक, बक्षीसपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी तसेच हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापू शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समितीचे कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजिनदार मारुती शिंदे तसेच रमाकांत शेट्ये, मनोहर पोतदार, अब्दुल हमीद खतीब, दीपक शेट्ये, प्रसाद कोलते, मिलिंद भिंगार्डे, विरेंद्र शेट्ये आणि सुहास कदम यांनी केले आहे.

