(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात समुद्रकिनाऱ्यावरील वॉटर स्पोर्ट व्यवसायिक आणि गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या जीवरक्षक व पोलीस यंत्रणेला यश आले होते. समुद्रात बुडताना जीवदान मिळवून देण्याची घटना लक्षात घेता दिवाळी पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथे विविध ठिकाणाहून येणाऱ्या पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत मोठी खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत, देवस्थान समिती व गणपतीपुळे पोलीस यंत्रणेने केले आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक मोठ्या संख्येने गणपतीपुळे येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्यावर कुठलाही धोका उद्भवू नये या उद्देशाने पर्यटकांनी समुद्रस्नानाबाबत सुरक्षितता बाळगून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामध्ये पर्यटकांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाऊ नये, समुद्रातील भरती ओहोटीचा वेग, मोठ्या लाटा आणि प्रवाह याविषयीची माहिती स्थानिक व्यावसायिक आणि जीव रक्षकांकडून घ्यावी तसेच जीव रक्षक आणि वॉटर स्पोर्ट व्यवसायिकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे करावे. त्याशिवाय समुद्रकिनारी लावलेले लाल झेंडे आणि जीव रक्षकांचे इशारे याबाबत माहिती घ्यावी तसेच स्वतःची आणि कुटुंबियांची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ सुरक्षित मर्यादेतच समुद्रस्नानाचा आनंद घ्यावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मोरया वॉटर स्पोर्ट ची तत्परता!
गणपतीपुळे समुद्रात एखादा पर्यटक बुडत असेल तर त्याला पाण्याबाहेर काढण्यासाठीआणि त्याचा जीव वाचवण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या कर्मचाऱ्यांकडून विशेष तत्परता दाखवली जाते. या कर्मचाऱ्यांमुळेच गेल्या काही वर्षात गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा यंदाच्या दिवाळी हंगामापासून वॉटर स्पोर्ट व्यवसायिक समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले असल्याकारणाने कोण समुद्राच्या पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांवर अतिशय दक्षपणे लक्ष केंद्रित जाईल, मत व्यक्त केले जात आहे.

