(चिपळूण /रत्नागिरी)
जनावरे चारण्यासाठी नेलेल्या म्हशींवरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना तालुक्यातील कटरे-खैरवाडी येथे घडली. ही घटना मंगळवारी (दिनांक १६/०६/२०२६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात ६५ वर्षीय शेतकऱ्याला काठीने मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ आत्माराम जाधव (वय ६५, रा. कटरे-खैरवाडी) हे मंगळवारी सकाळी आपली म्हैशी व इतर जनावरे चारण्यासाठी परिसरात गेले होते. जनावरे चारून घरी परतत असताना कॅनॉलजवळ आरोपी श्रीकांत केशव खैर (वय ४०) हा देखील आपल्या म्हशी घेऊन तेथे आला होता. यावेळी जनावरे एकमेकांना इजा पोहोचवू नयेत, या हेतूने फिर्यादींनी आरोपीला म्हशी मागे फिरवण्यास सांगितल्याचे समजते. मात्र, या सूचनेचा राग आल्याने आरोपीने हातातील काठीने फिर्यादींच्या दोन्ही पायांच्या मांडी, पोटरी तसेच हातांवर वारंवार प्रहार करून दुखापत केल्याचा आरोप आहे. याशिवाय आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर जखमी शेतकऱ्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत दुखापत करणे, शिवीगाळ करणे आणि धमकी देणे यासंदर्भातील विविध कलमांन्वये सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामीण भागात जनावरे चारण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात आता चर्चा रंगली आहे.

