(संगमेश्वर / एजाज पटेल )
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून शनिवारी संध्याकाळी त्यांनी संगमेश्वर येथील नूतन एसटी बसस्थानकाला अचानक भेट दिली. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांनी थेट आपला ताफा बसस्थानकाकडे वळविल्याने एसटी प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र ही भेट केवळ औपचारिक पाहणीपुरती मर्यादित न राहता, त्यांनी स्थानकातील विविध सुविधा आणि व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला.
स्थानकातील सुविधांची बारकाईने तपासणी
बसस्थानकात दाखल होताच मंत्री सरनाईक यांनी स्थानक परिसर, प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष तसेच कर्मचारी निवासस्थानांची बारकाईने पाहणी केली. स्थानकातील स्वच्छता, नियोजनबद्ध व्यवस्था आणि महिला प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. विशेषतः हिरकणी कक्षातील सुविधा पाहून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.
यावेळी हिरकणी कक्षात चोवीस तास वीज, पाणी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध राहावे, तसेच प्रवाशांना सुविधा सहज सापडाव्यात यासाठी ठळक दिशादर्शक फलक उभारावेत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
प्रवाशांमध्ये बसून घेतला उपहाराचा आस्वाद
स्थानक पाहणीनंतर मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील अधिकृत उपहारगृहाला भेट दिली. उपहारगृहातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, स्वच्छता आणि वापरल्या जाणाऱ्या साहित्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित खाद्यपदार्थ मिळत आहेत का, याची खात्री करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रवाशांमध्ये बसून उपहाराचा आस्वाद घेतला.
यावेळी उपहारगृह चालक वैभव भोजने यांच्याकडून खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलासह अन्य घटकांची माहिती घेतली. विशेष म्हणजे, कोणताही व्हीआयपी बडेजाव न दाखवता त्यांनी उपहाराचे बिल स्वतः रोख रक्कम देऊन अदा केले. त्यांच्या या साधेपणाची उपस्थितांनी दखल घेतली.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीचे आदेश
पाहणीदरम्यान स्थानिक पत्रकारांनी बसस्थानकातील एका महत्त्वाच्या समस्येकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आधुनिक बसस्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
या गंभीर त्रुटीची तात्काळ दखल घेत मंत्री सरनाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जागेवरच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. अत्याधुनिक बसस्थानक असूनही प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खाजगी धाब्यांवर गाड्या थांबवणाऱ्यांवर कारवाईचे संकेत
रात्रीच्या लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या अधिकृत उपहारगृहांऐवजी काही खाजगी धाब्यांवर थांबविल्या जात असल्याचा मुद्दाही यावेळी पत्रकारांनी उपस्थित केला. यावर मंत्री सरनाईक यांनी गंभीर भूमिका घेत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्यस्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.
काही चालक-वाहक आणि खाजगी धाबा चालक यांच्यातील संगनमतामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत असल्याच्या तक्रारी गंभीर असल्याचे नमूद करत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
परिवहन मंत्र्यांच्या या औचक भेटीमुळे बसस्थानकातील सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला, तर त्यांच्या साधेपणा आणि तत्पर निर्णयक्षमतेमुळे संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांमधून त्यांच्या कामकाजाचे कौतुक होत आहे.

