(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सेवांच्या दरात २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही दरवाढ १ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती राजापूर तालुका नाभिक व्यावसायिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण चव्हाण यांनी दिली.
संघाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. गेल्या काही वर्षांत वीजदर, दुकानांचे भाडे, सौंदर्यप्रसाधने, हेअर केअर उत्पादने, उपकरणे, सॅनिटायझेशन साहित्य तसेच इतर आवश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. याशिवाय व्यवसाय चालविण्याचा एकूण खर्चही मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरवाढ अपरिहार्य झाल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयानुसार तालुक्यातील सलून व ब्युटी पार्लरमधील विविध सेवांच्या विद्यमान दरांमध्ये २० टक्क्यांची वाढ करण्यात येणार असून, ग्राहकांना नवीन दरपत्रकानुसार सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरवाढीबाबत ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी राजापूर तालुका नाभिक व्यावसायिक संघाचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सचिव विश्वनाथ कदम, सल्लागार श्रीकांत कदम, पाचल विभाग अध्यक्ष राजू चव्हाण, विभाग सचिव विशाल सकपाळ, खजिनदार सुनील चव्हाण यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातील सर्व सलून आणि ब्युटी पार्लर व्यावसायिकांनी संघटनेच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, तसेच ग्राहकांना नवीन दरपत्रकाची माहिती स्पष्टपणे द्यावी, असे आवाहनही बैठकीत करण्यात आले. व्यवसायाची गुणवत्ता टिकवून ठेवत ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

