(संगमेश्वर / एजाज पटेल)
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महिलांचा विचार करताना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडये गावातील पूनम देसाई यांचे नाव विशेषत्वाने घ्यावे लागते. कोंडये गावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान मिळवून त्यांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर ग्रामीण नेतृत्वात महिलांची सक्षम ओळख निर्माण केली. शहरातून ग्रामीण जीवनात आलेल्या या सुशिक्षित महिलेने गावाशी घट्ट नाते जोडत विकासाची दिशा ठरवली.
मुळात शहरात वाढलेल्या पूनम देसाई लग्नानंतर कोंडये या गावात आल्या. शहरातील आधुनिक विचारसरणी आणि ग्रामीण परंपरा यांचा मेळ घालत त्यांनी गावच्या संस्कृतीला आपलेसे केले. ग्रामीण जीवनशैली स्वीकारत गावच्या मातीशी नाळ जुळवणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र त्यांनी ते आत्मविश्वासाने पेलले आणि अल्पावधीतच गावकऱ्यांचा विश्वास संपादन केला.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि संस्कृतीशी असलेली बांधिलकी विशेष उल्लेखनीय आहे. सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा सरपंच म्हणून कामकाज, डोक्यावरचा पदर हा त्यांच्या सुसंस्कृततेचे आणि परंपरेप्रती आदराचे प्रतीक मानला जातो. आधुनिक विचार आणि पारंपरिक मूल्यांचा समतोल त्यांनी आपल्या वागणुकीतून जपला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आदर निर्माण झाला आहे.
पाच वर्षांपूर्वी कोंडये गावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. तो केवळ आरक्षणामुळे मिळालेला पदाचा मान नव्हता, तर गावाच्या विकासासाठी नवीन दृष्टीकोन घेऊन काम करण्याची संधी होती. विशेष म्हणजे, सध्याचे सरपंच महेश देसाई हे त्यांचे पती असून दोघांनीही गावाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम केले आहे. पूनम देसाई यांनी आपल्या कार्यकाळात विकासाचा भक्कम पाया रचला आणि आज त्या पायावर गाव प्रगतीची वाटचाल करत आहे.
महिलांना सक्षम बनवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. बचत गटांना बळ देऊन महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी त्यांनी प्रयत्न केले. एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब उभे राहते, हा विचार त्यांनी केंद्रस्थानी ठेवला. गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी विविध उपक्रम राबवले. विशेषतः महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेबाबत केलेले प्रयत्न त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची साक्ष देतात.
महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व केवळ पदापुरते मर्यादित न राहता ते परिवर्तनाचे साधन कसे ठरू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पूनम देसाई यांची कारकीर्द. त्यांनी ग्रामीण भागातील महिलांना आत्मविश्वास दिला आणि समाजकारणात पुढे येण्यासाठी प्रेरणा दिली.
आज महिला दिनाच्या निमित्ताने पूनम देसाई यांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर ग्रामीण समाजात उभ्या राहणाऱ्या स्त्रीशक्तीचा गौरव आहे. पद मिळाल्यानंतरही आपल्या मुळांशी नाळ कायम ठेवत विकासासाठी झटणारे त्यांचे नेतृत्व हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
कोंडये गावाच्या प्रगतीत त्यांचे योगदान आणि त्यांना मिळालेली कुटुंबाची साथ हे आदर्श लोकप्रतिनिधित्वाचे उदाहरण आहे. त्यांच्या रूपाने गावातील महिलांना आपला आवाज मिळाला असून त्या त्यांच्या अडीअडचणीत खंबीरपणे उभ्या राहतात.
पूनम देसाई यांचा प्रवास म्हणजे संगमेश्वरच्या मातीतील स्त्रीशक्तीचा एक ठाम आवाज आहे. पहिल्या महिला सरपंच म्हणून त्यांनी सुरू केलेली ही वाटचाल भविष्यात अनेक सुशिक्षित महिलांना ग्रामीण समाजकारणात सहभागी होण्यासाठी प्रेरणा देईल. परंपरेचा पदर आणि विकासाची जिद्द या दोन्ही गोष्टींचा संगम घडवत त्यांनी उभे केलेले कार्य खरोखरच वंदनीय आहे.

