( विल्ये / अमित कांबळे )
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आज, सोमवार (दि. २७ जुलै) सकाळी ११ वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
या आंदोलनातून पक्षाने शासनाकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, बदर आयोग रद्द करावा, तसेच अनुसूचित जातींसंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व समाजघटकांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, तसेच शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची त्वरित अंमलबजावणी करावी, अशीही मागणी पक्षाने केली आहे.
या निदर्शनात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ सदस्य, युवक कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे जिल्हाध्यक्ष प्रितम रुके, जिल्हा सचिव आदेश मर्चंडे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष विलास कांबळे आणि तालुका सचिव उज्वल कांबळे यांनी केले आहे.

