(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील पेठकिल्ला रोड परिसरात एका भटक्या कुत्र्यावर झालेल्या निर्घृण अत्याचाराच्या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. मुक्या प्राण्यावरील क्रौर्याचा कळस गाठणाऱ्या या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
या प्रकरणी इशान प्रसाद खानोलकर (वय २२, रा. दत्तगिरी, बंदर रोड, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ६ जून रोजी सायंकाळी ५.३० ते ७ जून रोजी सकाळी १०.०९ या कालावधीत पेठकिल्ला रोडवरील पाथरे बागेजवळील नाईक कंपनीसमोर हा अंगावर शहारे आणणारा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात व्यक्तीने भटक्या कुत्र्याचे दोन्ही डोळे गंभीररीत्या जखमी केले. त्यातील एक डोळा बाहेर आल्याची स्थिती होती. एवढ्यावरच न थांबता संबंधिताने कुत्र्याच्या डोक्यावर टोकदार वस्तूने वार केल्याचा आरोप आहे. तसेच त्याचे दोन्ही मागचे पाय बांधून ठेवण्यात आले होते आणि मागील डावा पाय मोडल्याची बाबही समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत हा मुका प्राणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी जोर धरू लागली होती.
दरम्यान, रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१)(अ) आणि ११(१) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीप्रेमी, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे. मुक्या जीवावरील या क्रूर अत्याचारामुळे शहरभर हळहळ व्यक्त होत असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

