(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
मुसळधार पावसाच्या एका भयावह रात्रीने खेड तालुक्यातील दहिवली-शेलारवाडी येथील शेलार कुटुंबाचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला. कालपर्यंत एकमेकांच्या आधाराने, साधेपण आणि समाधानाचे आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबावर नियतीने असा घाला घातला की, काही क्षणांत त्यांचे घर मातीच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत बेपत्ता झालेले सतीश शांताराम शेलार (३०) आणि शांताराम बलराम शेलार (८४) यांचे मृतदेह अखेर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) जवानांनी ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर शोधमोहीमही अधिकृतपणे पूर्ण करण्यात आली.
गेल्या दोन ते तीन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दहिवली-शेलारवाडी परिसरात सोमवारी (६ जुलै) रात्री सव्वा नऊच्या सुमारास अचानक भूस्खलन झाले. डोंगराचा मोठा भाग कोसळून शेलार कुटुंबाचे घर क्षणार्धात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेत सतीश शेलार आणि त्यांचे वडील शांताराम शेलार हे ढिगाऱ्याखाली अडकले, तर कल्पना शांताराम शेलार (७३) यांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना त्याच रात्री तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मध्यरात्री चिपळूणहून एनडीआरएफचे विशेष पथक दहिवलीत पोहोचले. मुसळधार पाऊस, अंधार आणि प्रचंड चिखल यामुळे बचावकार्य अत्यंत धोकादायक ठरत होते. मात्र, जीवाची पर्वा न करता शेलारवाडीतील काही तरुणांसह एनडीआरएफच्या जवानांनी रात्रभर शोधमोहीम सुरू ठेवली. ढिगारा हटविणे, यंत्रणांना मदत करणे आणि परिसर सुरक्षित ठेवणे, अशी विविध कामे स्थानिक ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने केली. अखेर मंगळवारी दोन्ही बेपत्ता व्यक्तींचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले.
दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः घटनास्थळी ठाण मांडले होते. त्यांनी बचावकार्यात एनडीआरएफ, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात समन्वय साधत प्रतिकूल परिस्थितीतही शोधमोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी त्यांनी आवश्यक सूचना देऊन स्वतःही शोधमोहीमेत सहभागी झाले होते. यानंतर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. बचावकार्याची गती, बाधित परिसराची स्थिती तसेच विविध यंत्रणांकडून सुरू असलेल्या मदतकार्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
दरम्यान, दुसरीकडे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कल्पना शेलार यांनी त्या काळरात्रीची आठवण सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “रात्री सात वाजता आम्ही तिघांनी जेवण केलं आणि झोपलो. थोड्या वेळाने माझे म्हातारे लघुशंकेसाठी उठले. तेवढ्यात जोराचा वारा सुटला. माझा मुलगा म्हणाला, ‘बाहेर जाऊ नका… सुसाट वारा आहे.’ आम्ही तिघेही जागे होतो. पण काही क्षणांतच तोच वारा आणि दरड घरावर कोसळली. माझा मुलगा… माझा नवरा कुठे गेले… काहीच समजलं नाही…” या काही शब्दांत एका आईची असहाय्यता, एका पत्नीची वेदना आणि एका कुटुंबावर ओढवलेल्या अकल्पित संकटाची तीव्रता दडलेली होती. दोन वेळच्या जेवणात समाधान मानणारे, एकमेकांच्या आधाराने जगणारे हे तिघांचे कुटुंब एका रात्रीत उद्ध्वस्त झाले. वृद्धापकाळात आधार देणारा नवरा गेला… आमच्या पुढील आयुष्याची जबाबदारी सांभाळणारा मुलगाही निघून गेला… आणि आता रुग्णालयाच्या खाटेवर उपचार घेत असलेल्या ७३ वर्षीय कल्पना शेलार यांच्यासमोर आयुष्याचा कठीण प्रवास उभा आहे.
सरकारकडून मदतीची घोषणा होईल, पंचनामे पूर्ण होतील, आर्थिक सहाय्यही मिळेल. मात्र, गेलेले आपली माणसं कोणत्याही मदतीने परत येत नाहीत. वृद्धापकाळातील आधार, मुलाचे प्रेम आणि संसाराचा कणा एका क्षणात कोसळल्यानंतर उरते ती केवळ आठवणींची राख आणि आयुष्यभराची पोकळी.
दहिवलीतील ही दुर्घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही; तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर डोंगरकडील वसाहतींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे. या दुर्घटनेने संपूर्ण कोकणाला हळहळ व्यक्त करण्यास भाग पाडले असून, शेलार कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण समाज सहभागी झाला आहे. दोन निष्पाप जीवांच्या निधनाने दहिवली गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

