(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा रत्नागिरीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ‘वर्षावास’ या धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या वर्षावास धम्म प्रबोधन प्रवचन मालिकेचा शुभारंभ बुधवार, दि. २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला बौद्ध समाजातील उपासक-उपासिका, महिला मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच धम्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या संस्कार समिती या उपसमितीच्या माध्यमातून समाजात धार्मिक जनजागृती घडवून आणणे, भगवान बुद्धांचा धम्म अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविणे, तसेच नैतिक मूल्यांची जोपासना आणि सामाजिक प्रबोधनाला चालना देणे या उद्देशाने दरवर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही ही परंपरा कायम ठेवत तालुक्यातील विविध गावशाखांमध्ये प्रवचनांची मालिका आयोजित करण्यात आली आहे.
या प्रवचन मालिकेचा शुभारंभ वाटद-खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात होणार असून, करबुडे येथील ज्येष्ठ धम्म अभ्यासक विजय जाधव हे प्रमुख प्रवचनकार म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. भगवान बुद्धांचे विचार, धम्माची शिकवण, सामाजिक समता, बंधुता आणि मानवी मूल्यांवर आधारित प्रबोधनपर मार्गदर्शन त्यांच्या प्रवचनातून करण्यात येणार आहे.
शुभारंभानंतर तालुक्यातील विविध गावशाखांमध्ये पुढीलप्रमाणे वर्षावास धम्म प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
२३ ऑगस्ट – जयभीमनगर, सैतवडे : प्रमुख प्रवचनकार रविकांत पवार (मालगुंड)
६ सप्टेंबर – वाटद पूर्व : प्रमुख प्रवचनकार ऋतुजा आंबुलकर (आंबेडकरवाडी, रत्नागिरी)
२० सप्टेंबर – कोळीसरे : प्रमुख प्रवचनकार संतोष कदम (बसणी)
४ ऑक्टोबर – कासारवेली : प्रमुख प्रवचनकार प्रशांत जाधव (सडामिऱ्या)
१८ ऑक्टोबर – कपिलवस्तूनगर, करबुडे : प्रमुख प्रवचनकार वैभव पवार (मालगुंड)
याशिवाय आश्विन पौर्णिमेनिमित्त फणसोप येथे समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, पूज्य भंते यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मप्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून वर्षावास उपक्रमाची सांगता होणार आहे.
दरम्यान, या वर्षावास कार्यक्रमाचे नियोजन दि. २१ जून रोजी रत्नागिरी येथे झालेल्या बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेच्या जनरल बैठकीत करण्यात आले. या बैठकीस तालुका शाखेचे प्रमुख पदाधिकारी, संस्कार समितीचे सदस्य, विविध गावशाखांचे पदाधिकारी, सभासद तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संपूर्ण वर्षावास कार्यक्रमाचे वेळापत्रक, आयोजन, जबाबदाऱ्या आणि विविध गावशाखांतील कार्यक्रमांचे नियोजन निश्चित करण्यात आले.
तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी सांगितले की, वर्षावास हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून समाजात धम्माची मूल्ये रुजविणारा आणि सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक गावशाखेतील पदाधिकारी, सभासद, महिला मंडळ, बौद्धाचार्य, उपासक-उपासिका तसेच युवक-युवती यांनी या सर्व कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.
संस्कार समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही यंदाच्या वर्षावास धम्म प्रबोधन प्रवचन मालिकेचे नियोजन व्यापक स्वरूपात करण्यात आले असून, तालुक्यातील सर्व गावशाखांमध्ये हे कार्यक्रम धार्मिक उत्साह, शिस्तबद्ध नियोजन आणि मोठ्या सहभागातून यशस्वीपणे पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

