(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पर्ससीन नेट मासेमारी हंगामाला सुरुवात होऊन अवघा महिना उलटला असतानाच खलाशांच्या पलायनाच्या घटना वाढू लागल्या आहेत. अनेकांनी नौकामालकांकडून लाखो रुपयांचा ॲडव्हान्स घेतला, काही महिने काम केले आणि अचानक गावाकडे पलायन केले. यात नेपाळी खलाशांची संख्या लक्षणीय असल्याचे चित्र आहे. परिणामी नौकामालक आर्थिक फटक्याबरोबरच नव्या संकटात अडकले आहेत.
पर्ससीन मासेमारीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र त्यासाठी लागणाऱ्या खलाशांची उपलब्धता नेहमीच डोकेदुखी ठरते. स्थानिक खलाशी अपुरे पडल्याने मालकांना कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, बंगाल अशा परराज्यातून मजूर आणावे लागतात. यासाठी त्यांना हजारो रुपयांचा ॲडव्हान्स द्यावा लागतो. पण काही खलाशी ॲडव्हान्स रक्कम घेऊन मधेच काम सोडून पळून जातात. त्यामुळे मालकांना आर्थिक नुकसान होऊन स्वतःलाच समुद्रात खलाशांबरोबर उतरावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
दरम्यान, यंदा मासेमारी अपेक्षित प्रमाणात झालेली नाही. वातावरणातील अस्थिरतेमुळे अनेकवेळा मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. तरीदेखील खलाशांच्या पगारासोबतच त्यांच्या अन्नखर्चाचा भार मालकांवर आहे. आठ महिन्यांच्या बंदीनंतर सुरू झालेल्या या हंगामात खलाशांनी साथ देण्याऐवजी पलायनाचा मार्ग अवलंबल्याने मालक संकटात सापडले आहेत. अॅडव्हान्सची रक्कम वसूल करायची कशी, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
डिझेल खर्चावरही संकट
एका पर्ससीन नौकेसाठी सरासरी २५ ते ३० खलाशी लागतात. मात्र जिल्ह्यातील मजूर उपलब्धतेच्या अडचणींमुळे मालकांना परराज्यातूनच खलाशी आणावे लागतात. त्यासाठी मोठा खर्च उचलावा लागतो. याशिवाय, मिळणाऱ्या माशांच्या प्रमाणात डिझेलचा खर्च भागत नसल्याने नौकामालकांवर आणखी आर्थिक ताण आला आहे. आता खलाशांच्या पलायनाने या संकटात भरच पडली आहे.

