(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे २०२४-२०२५ या वर्षासाठी पोलीस शिपाई व चालक अशा एकूण १०८ पदांसाठी भरती प्रक्रिया उद्या (दि. १३) पासून मिरजोळे एमआयडीसी क्रीडा संकुल येथे सुरू होत आहे. १३ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत पार पडणाऱ्या या भरतीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून एकूण ६,४७९ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया शासनाच्या नियमांच्या अधीन राहून, पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेच्या निकषांवर आधारित राबवली जाणार असल्याचा पुनरुच्चार जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी उपस्थित होते.
एकूण १०८ पदांपैकी १०० पदे पोलीस शिपाई आणि ८ पदे चालकासाठी असून शिपाई पदासाठी १,०२८ महिला व ३,०८४ पुरुष उमेदवारांनी अर्ज केले आहेत, तर चालक पदासाठी १३४ महिला व २,२३४ पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केल्याने यंदाची स्पर्धा अधिक चुरशीची ठरणार आहे. भरती प्रक्रिया पहाटे ५.३० वाजल्यापासून सुरू होणार असून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येईल. महिला व पुरुष उमेदवारांसाठी १०० मीटर धावणे आणि गोळाफेक अनिवार्य असणार आहे. तसेच महिलांसाठी ८०० मीटर आणि पुरुषांसाठी १,६०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. सर्व चाचण्या शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पार पडतील. या प्रक्रियेसाठी सुमारे साडेपाचशेपेक्षा अधिक अंमलदार आणि ६० अधिकारी तैनात राहणार असल्याची माहिती अधीक्षक बगाटे यांनी दिली.
भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा देत अधीक्षक बगाटे म्हणाले की, उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. डमी उमेदवारांचा वापर किंवा पैशांची देवाणघेवाण आढळल्यास संबंधितांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल. भरतीच्या नावाखाली कोणी अमिष दाखविल्यास किंवा आर्थिक मागणी केल्यास रत्नागिरी पोलिसांच्या ‘रत्न सेतु’ व्हॉट्सॲप चॅटबॉट (९३७१४१५६१२) वर तक्रार नोंदवावी. तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर, किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) रत्नागिरी अथवा ठाणे येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे माहिती देता येईल. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
भरती प्रक्रियेदरम्यान मैदान सुसज्ज करण्यात आले असून उमेदवारांनी लावण्यात आलेले सूचना फलक व दिशादर्शकांचा वापर करावा, तसेच पालकांनीही नोकरीचे आमिष दाखवणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पारदर्शकता, शिस्त आणि गुणवत्ता या त्रिसूत्रीवर आधारित ही भरती प्रक्रिया रत्नागिरीत काटेकोरपणे राबवली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

