( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा हातखंबा यांच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील नववे पुष्प रविवारी (६ सप्टेंबर) त्रिरत्न निवास येथे उत्साहपूर्ण वातावरणात गुंफण्यात आले. ग्रामशाखेचे अध्यक्ष अनंत बाळू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर तसेच लांजा तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष आदेश जाधव यांनी ‘साकेत (अयोध्या) नगरीचा खरा इतिहास’ या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी आदेश जाधव, कार्यक्रमाध्यक्ष अनंत कांबळे, जिल्हा संघटक तानाजी कांबळे, रत्नागिरी तालुकाध्यक्ष सुनील पवार, तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष प्रीतम सावंत, सचिव राजेंद्र कांबळे, संस्कार विभाग सचिव स्वप्नील पवार, संरक्षण विभाग सचिव प्रमोद जाधव, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा शालिनी कांबळे, बौद्धाचार्य व माजी श्रामणेर अनिल कांबळे तसेच ज्येष्ठ बौद्धाचार्य सुधाकर बेटकर यांच्या हस्ते आदर्शांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. अगरबत्ती व मेणबत्ती प्रज्वलित करून सामूहिकरीत्या त्रिसरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. यानंतर ग्रामशाखेच्या वतीने आजचे प्रवचनकार आदेश जाधव यांच्यासह उपस्थित जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी शुभांगी कांबळे व रचना पवार, समता सैनिक प्रतीक पवार तसेच जिल्ह्यातील माजी श्रामणेर व बौद्धाचार्य यांचे धम्मविषयक पुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. तालुका शाखेच्या वतीने ग्रामशाखेचे पदाधिकारी तसेच कार्यक्रमाध्यक्ष, सचिव, महिला मंडळाच्या उपाध्यक्षा व सचिव यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रवचनात आदेश जाधव यांनी साकेत नगरीचा उगम, वाढ, विकास आणि तत्कालीन महत्त्व यांचा विविध ऐतिहासिक व बौद्ध साहित्यिक संदर्भांसह ऊहापोह केला. राजा प्रसेनजीत आणि विशाखा यांचा साकेत नगरीशी असलेला जवळचा संबंध स्पष्ट करताना तथागत बुद्धांच्या काळात या नगराची झालेली निर्मिती व झालेला विकास त्यांनी विविध उदाहरणांतून मांडला. तथागत बुद्धांच्या काळातील सहा महानगरांपैकी साकेत हे एक महत्त्वाचे नगर होते, असे सांगत त्यांनी या नगरीशी निगडित असलेल्या बुद्धकालीन आठवणी, शिल्पे आणि बौद्ध साहित्यामधील संदर्भांकडे लक्ष वेधले. सुत्तपिटकात नमूद असलेली अनेक सुत्ते तथागत बुद्धांनी साकेत नगरीत सांगितल्याचा उल्लेख बौद्ध साहित्य आणि त्रिपिटकात आढळतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
साकेत नगरीचा इतिहास समजून घेण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास आवश्यक आहे, असे प्रतिपादन करताना त्यांनी इतिहासाकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याचे आवाहन केले. सध्याची अयोध्या हीच प्राचीन साकेत नगरी असल्याचा दावा करताना फैसलाबाद परिसरात प्राचीन अयोध्येच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. निसर्गातील विविध घडामोडींमुळे साकेत नगरीच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे जमिनीखाली गाडले गेले असण्याची शक्यता व्यक्त करताना, उत्खननात सापडणारे बुद्धकालीन अवशेष योग्य पद्धतीने जतन करून त्यांचा ऐतिहासिक अभ्यास होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. “खरा इतिहास समजून घेऊन बुद्धकालीन अवशेषांच्या जतनासाठी प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
तालुका संस्कार विभागाचे उपाध्यक्ष प्रीतम सावंत यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि उपस्थितीबद्दल हातखंबा ग्रामशाखेचे अभिनंदन केले. तालुका संरक्षण विभागाचे सचिव प्रमोद जाधव यांनी हातखंबा ग्रामशाखेतून जास्तीत जास्त समता सैनिक घडविण्याचे आवाहन केले. तालुक्याच्या वतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या समता सैनिक शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी वर्षावासाचे महत्त्व अधोरेखित करताना तरुणांनी धम्मकार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन केले. भगवान बुद्धांच्या शिकवणीचे आचरण करून वैयक्तिक तसेच सामाजिक प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा संघटक तानाजी कांबळे, ज्येष्ठ बौद्धाचार्य सुधाकर बेटकर, माजी श्रामणेर अनिल जाधव, अमित जाधव तसेच ग्रामशाखेचे सभासद आयु. विद्याधर कांबळे यांनीही वर्षावासाचे महत्त्व विशद करून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, इयत्ता दहावीची परीक्षा तसेच पदवी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या तीन विद्यार्थ्यांचा तालुका शाखेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामशाखेच्या वतीने राजेंद्र कांबळे यांनी केले. तालुका शाखेच्या वतीने संस्कार विभागाचे सचिव स्वप्नील पवार यांनी सूत्रसंचालन करून ग्रामशाखेचे आभार मानले. ग्रामशाखेचे सचिव सुनील कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानून शरणतेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर सुनील बाळू कांबळे व शालिनी सुनील कांबळे यांच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनदान करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा व तालुका शाखेचे पदाधिकारी, ग्रामशाखेचे सभासद उपस्थित होते.

कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन आणि वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुस्तकरुपी धम्मदान
यावेळी ग्रामशाखेचे सचिव सुनील जयराम कांबळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामशाखेतील प्रत्येक कुटुंबाला ‘भारतीय संविधान’ आणि ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ ही पुस्तके वडिलांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प म्हणून हे धम्मदान केले आहे. यासोबत कुटुंबात कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना फुले-शाहू-आंबेडकरी विचारांची ही छोटीशी भेट प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. ‘भारतीय संविधान’ आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ही केवळ पुस्तके नसून समता, स्वातंत्र्य, बंधुता, प्रज्ञा आणि करुणेच्या जीवनमार्गाची प्रेरणा देणारे विचारधन आहे. आमच्या आनंदाचा हा क्षण समाजाच्या वैचारिक समृद्धीसाठी उपयोगी पडावा, हीच आमचे वडील आणि ग्रामशाखेचे माजी अध्यक्ष दिवंगत जयराम रावजी कांबळे यांच्या स्मृतींना खरी आदरांजली आहे.” अशी प्रतिक्रिया सुनील जयराम कांबळे यांनी व्यक्त केली आहे.


