(संगमेश्वर / एजाज पटेल)
ज्या वयात आईच्या कुशीत विसावून, वडिलांच्या हातात खेळून आयुष्याची सुरुवात करायची, त्या अवघ्या २४ दिवसांच्या चिमुकल्यावर नियतीने कठोर आघात केला आहे. संगमेश्वर तालुक्यातील देण गावातील या बाळाची प्रकृती गंभीर असून मुंबईतील प्रसिद्ध वाडिया हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात हे बाळ मृत्यूशी झुंज देत आहे. मात्र उपचारांचा वाढता खर्च या गरीब शेतकरी कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेल्याने आता या चिमुकल्याला वाचवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची नितांत गरज आहे.
संगमेश्वर तालुक्यातील देण गावातील अशोक बबन भोजे हे गरीब, कष्टकरी आणि प्रामाणिक शेतकरी आहेत. शेतात राबून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भोजे कुटुंबात अवघ्या २४ दिवसांपूर्वी चिमुकल्या बाळाचे आगमन झाले. नव्या पाहुण्याच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. जन्मानंतर काही दिवसांतच बाळाची प्रकृती अचानक गंभीर झाली आणि त्याला तातडीने मुंबई येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये तपासण्या केल्यानंतर बाळाच्या शरीरात रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याचे समोर आले. या गाठींचा परिणाम त्याच्या नाजूक फुफ्फुसांवर, दोन्ही किडन्यांवर तसेच इतर महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांवर झाला होता. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करत बाळावर तातडीने अत्यंत कठीण ऑपरेशन पार पाडले. मात्र ऑपरेशननंतरही त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आणि नाजूक आहे. बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
आपल्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी अशोक भोजे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत घरातील सर्व पुंजी पणाला लावली. उसनवार केली, नातेवाईकांकडून मदत घेतली आणि आतापर्यंत उपचारांवर तब्बल ४.५० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. मात्र पुढील उपचार आणि ऑपरेशन्ससाठी अजून मोठ्या प्रमाणात खर्च अपेक्षित असल्याने हा आर्थिक भार पेलणे या गरीब शेतकरी कुटुंबासाठी आता अत्यंत कठीण झाले आहे.
आपल्या चिमुकल्याची अतिदक्षता विभागात नळ्या आणि वैद्यकीय उपकरणांच्या आधारावर सुरू असलेली झुंज पाहून पालकांचे काळीज हेलावून गेले आहे. बाळाला आईच्या कुशीतले सुखही अनुभवता आले नाही, याचे दुःख पालकांना कायम सतावत आहे. उपचारांचा खर्च भागवण्यासाठी आता विकण्यास किंवा गहाण ठेवण्यासही काही शिल्लक नसल्याने कुटुंबीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
या २४ दिवसांच्या निष्पाप जीवाची झुंज केवळ पैशांअभावी थांबू नये, यासाठी संगमेश्वरसह महाराष्ट्रातील दानशूर नागरिक, सामाजिक संस्था आणि संवेदनशील व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. मदतीची रक्कम कितीही छोटी असली तरी ती या कुटुंबासाठी मोठा आधार ठरू शकते. १००, ५०० रुपये किंवा शक्य होईल तेवढी मदतही बाळाच्या उपचारासाठी मोलाची ठरू शकते.
उपचार सुरू असलेल्या या चिमुकल्याला आर्थिक मदत करण्यासाठी 8355904529 या क्रमांकावर, किंवा स्कॅनरवर G-Pay करता येईल. तसेच bhojeashok3@oksbi या UPI ID वरही थेट मदत पाठवता येईल. या गरजू कुटुंबापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी ही माहिती आणि संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


