(गणपतीपुळे / वैभव पवार)
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोतवडे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे तिन्ही उमेदवार मोठ्या आणि निर्णायक मताधिक्याने निवडून आले आहेत. या निवडणुकीत कोतवडे जिल्हा परिषद गटातून राजेश यशवंत उर्फ राजू साळवी यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवले, तर नेवरे पंचायत समिती गणातून उमेदवार पूर्वा सचिन दुर्गवळी यांना भरघोस मतांनी विजयी करण्यात आले.
या यशामागे मालगुंड विभागातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली अथक मेहनत, नियोजनबद्ध प्रचार आणि संघटनात्मक ताकद महत्त्वाची ठरली. उमेदवारांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यात शिवसेनेचे उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांनी बजावलेली भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली आहे. त्यांच्या या भरीव आणि परिणामकारक कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते नामदार उदयजी सामंत यांनी त्यांचे खास शब्दांत कौतुक केले आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात मालगुंड येथे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोठी प्रचार सभा पार पडली होती. तसेच नेवरे येथे नामदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीतही भव्य प्रचार सभा घेण्यात आली. या दोन्ही सभांमध्ये कोतवडे व मालगुंड विभागातील सर्वच शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्याने विजयी करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता.
हा निर्धार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक निकालातून यशस्वी करून दाखवला. कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे आणि संघटनात्मक शिस्तीमुळे शिवसेना नेते नामदार उदय सामंत यांचा विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांना अपेक्षित असलेला तिन्ही उमेदवारांचा विजय मिळवून देण्यात शिवसेनेला यश आले आहे.
या दणदणीत विजयानंतर कोतवडे जिल्हा परिषद गट व मालगुंड विभागातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल नामदार उदय सामंत यांनी सर्व शिवसेना कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले.
त्याचबरोबर उपतालुका संघटक अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, मिळवलेले मताधिक्य कायम राखण्यासाठी आणि शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पुढील काळातही जोमाने कामाला लागण्याचे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.

