(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरातील मारुती मंदिर परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत असताना, उपलब्ध पार्किंग जागा असूनही ती वाहनांसाठी खुली न करण्यामागचे कारण काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एका बाजूला अर्धा रस्ता बॅरिकेड्स लावून बंदिस्त करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला मोकळी जागा *‘नो पार्किंग’*च्या फलकाखाली रिकामीच ठेवण्यात आल्याने वाहनचालकांचा संताप वाढत आहे.
एका बाजूला रस्त्याचे काम सुरू असल्याने बॅरिकेड्स टाकून अर्धा मार्ग बंदिस्त करण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला उपलब्ध मोकळी जागा वाहनांच्या पार्किंगसाठी खुली न केल्याने वाहतुकीचा ताण वाढत आहे. दुकानात किंवा कार्यालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पर्याय नसल्याने रस्त्याकडेला वाहने उभी केली जात असून, त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनत आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात उपलब्ध असलेली हक्काची पार्किंग जागा रिकामी ठेवणे आणि रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू देणे हे नियोजनशून्यतेचे लक्षण आहे. रस्त्यावरील कोंडीचा थेट परिणाम व्यापारी व्यवहारांवर तसेच दैनंदिन हालचालींवर होत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषद प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सदर जागा नियोजनबद्ध पार्किंगसाठी खुली करावी, तसेच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न अधिक बिकट होण्यापूर्वी नगर पालिकेने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे.
मोकळ्या जागेचा उपयोग दूरदृष्टीने करण्याची गरज
शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. मध्यवर्ती व्यापारी भागांमध्ये वाहनांची वाढती संख्या आणि मर्यादित जागा यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मारुती मंदिर परिसरासारख्या गजबजलेल्या भागात पार्किंगची उपलब्धता ही केवळ सुविधा नसून अत्यावश्यक गरज बनली आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता उपलब्ध प्रत्येक मोकळ्या जागेचा उपयोग दूरदृष्टीने करण्याची गरज अधोरेखित होत आहे. त्यामुळे मारुती मंदिर परिसरातील ही जागा भविष्यातील वाहतूक सुसूत्रतेचा विचार करून कायमस्वरूपी पार्किंगसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी आता अधिक ठामपणे पुढे येत आहे.

