(देवळे / प्रकाश चाळके)
मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे प्रभावित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत महामार्गाच्या कामामुळे निर्माण झालेल्या स्थानिक समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसानभरपाई, सेवा रस्त्यांची उभारणी, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या, बंद झालेले मार्ग, पूल व गटारांची आवश्यकता, सुरक्षित वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रभावित गावांच्या प्रतिनिधींनी प्रशासनासमोर विविध समस्या मांडल्या. महामार्गाच्या कामामुळे अनेक ठिकाणी शेतात जाणारे रस्ते बंद झाल्याने अडचणी निर्माण झाल्याचे, अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पावसाचे पाणी घरांमध्ये व शेतजमिनीत साचत असल्याचे, तसेच सेवा रस्ते आणि सुरक्षित क्रॉसिंगची तातडीची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी आमदार किरण सामंत यांनी ग्रामस्थांच्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. महामार्गाचे काम करताना स्थानिक नागरिकांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्यासह त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला.
जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून ग्रामस्थांच्या रास्त मागण्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. ज्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे शक्य आहे, त्यावर विलंब न करता कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच उर्वरित प्रकरणांचा निश्चित कालमर्यादेत पाठपुरावा करून मार्ग काढण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच महामार्गग्रस्त गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर आपल्या समस्या थेट मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या बैठकीमुळे मिऱ्या–नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून नागरिकांच्या समस्या लवकर मार्गी लागतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

