(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गणपतीपुळे येथील आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत सुमारे दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाली असली, तरी आजपर्यंत या इमारतीस कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी, कर्मचारी आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून, नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ आणि तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या गणपतीपुळ्यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य उपकेंद्रातच पाण्यासारखी मूलभूत सुविधा नसल्याची बाब गंभीर मानली जात आहे. याबाबत मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राकडून वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असला, तरी जिल्हा आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे समोर आले आहे.
गणपतीपुळे येथे दररोज दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक येतात. किरकोळ आजार किंवा आरोग्यविषयक अडचणी उद्भवल्यास अनेकजण या आरोग्य उपकेंद्राचा आधार घेतात. मात्र, पाणीपुरवठ्याची सुविधा नसल्याचे पाहून पर्यटकही आश्चर्य व्यक्त करत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.
आरोग्य उपकेंद्रात नियमित आरोग्य सेवा दिल्या जात असताना पाण्याअभावी स्वच्छता राखणे, दैनंदिन कामकाज सुरळीतपणे पार पाडणे आणि रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे कठीण होत असल्याचे कर्मचारी सांगतात. इमारत उभारताना पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेचा विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
या गंभीर समस्येबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. नुकत्याच मालगुंड ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या जिल्हा परिषद प्रभाग सभेतही हा विषय उपस्थित करण्यात आला. आरोग्य उपकेंद्रासाठी तातडीने कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
दोन वर्षांपासून सुसज्ज इमारत असूनही पाण्यासारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून गणपतीपुळे आरोग्य उपकेंद्राची पाणीपुरवठ्याची समस्या कायमची सोडवावी, अशी जोरदार मागणी होत असून, “आता तरी या आरोग्य उपकेंद्राला पाणी मिळणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

