(देवरूख / वार्ताहर)
देवरूख–रत्नागिरी मार्गावरील आंबव येथे शुक्रवारी सकाळी गवारेड्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या साडवली सह्याद्रीनगर येथील स्वप्नील पेडामकर (वय ३७) यांचा सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दिवसांपासून त्यांचेवर उपचार सुरू होते. स्वप्नीलच्या निधनाने सह्याद्रीनगर परिसरावर शोककळा पसरली असून सह्याद्रीनगर मित्र मंडळातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
स्वप्नील शुक्रवारी सकाळी कामानिमित्त मोटारसायकलवरून देवरूखहून रत्नागिरीकडे जात होते. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आंबव येथे रस्त्यालगतच्या जंगलातून अचानक गवारेडा रस्त्यावर आला आणि त्याची स्वप्नीलच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. या धडकेत ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला तसेच हाता-पायाला गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर स्वप्नीलला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील खासगी रुग्णालयात आणि पुढे डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
स्वप्नीलच्या पश्चात आई, एक भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या निधनामुळे पेडामकर कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सह्याद्रीनगर मित्र मंडळाने यंदाचा दहिहंडी उत्सव रद्द करून त्यातून जमा झालेला निधी स्वप्नीलच्या उपचारासाठी दिला होता. त्यांच्या निधनानंतर मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वप्नीलच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) सकाळी ९ वाजता साडवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


