(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर पोलीस ठाण्याचा गेल्या दीड वर्षांपासून अत्यंत कुशलतेने व संवेदनशीलतेने कारभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांची रत्नागिरी येथे बदली झाल्याने संगमेश्वर पोलीस ठाण्यात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. या प्रसंगी आयोजित विशेष समारंभात पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, व्यापारी वर्ग तसेच विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरोप सोहळ्यादरम्यान उपस्थितांच्या भावना अनावर झाल्या असून, चव्हाण यांच्याबद्दलचा आदर आणि आपुलकी स्पष्टपणे जाणवत होती.
याच कार्यक्रमात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांचेही उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते राजाराम चव्हाण व गजेंद्र पालवे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पोलीस-जनता संवाद अधिक दृढ करण्यासाठी राजाराम चव्हाण यांनी केलेल्या कार्याचे उपस्थितांनी मुक्तकंठाने कौतुक केले. त्यांच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
मनोगत व्यक्त करताना भावुक झालेल्या राजाराम चव्हाण यांनी संगमेश्वरमधील कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. “संगमेश्वरमधील दीड वर्षांचा काळ माझ्या सेवेतला अत्यंत समाधानकारक आणि संस्मरणीय काळ ठरला. येथील नागरिक, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि व्यापारी वर्गाने प्रत्येक प्रसंगी दिलेल्या सहकार्यामुळे अनेक आव्हाने यशस्वीपणे पेलता आली. संगमेश्वरकरांनी दिलेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी मी आयुष्यभर विसरणार नाही,” असे ते म्हणाले.
नवनियुक्त पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी पदभार स्वीकारताना पोलीस आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. “राजाराम चव्हाण यांनी निर्माण केलेली सलोख्याची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करू. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवून कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना प्रमोद शेट्ये यांनी राजाराम चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले. “चव्हाण साहेबांनी पोलीस आणि जनतेमधील दरी मिटवून विश्वासाचे नाते निर्माण केले. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ते स्वतः कर्मचाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून काम करत असत. त्यांचा जमिनीवरचा दृष्टिकोन आणि कर्तव्यनिष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे,” असे ते म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक उदय संसारे यांनीही चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “राजाराम चव्हाण यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर संगमेश्वरकरांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले. संवेदनशीलता, न्यायनिष्ठा आणि शिस्तबद्ध कारभार यामुळे त्यांनी सर्व स्तरांतील नागरिकांचा विश्वास संपादन केला. त्यांची बदली ही तालुक्यासाठी हानी असली तरी त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आहेत.”
याच वेळी उदय संसारे यांनी संगमेश्वरच्या जनतेच्या वतीने गजेंद्र पालवे यांचे स्वागत करत त्यांच्याकडूनही उत्कृष्ट कार्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्रीकृष्ण खातू गुरुजी यांनी केले. त्यांनी राजाराम चव्हाण यांच्या कार्यकाळातील विविध आठवणींना उजाळा देत उपस्थितांच्या भावनांना शब्द दिले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर, पोलीस अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, व्यापारी वर्ग आणि नागरिकांचे आभार मानले.

