(संगमेश्वर / एजाज पटेल)
राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वितरणासाठी संगमेश्वर एसटी बसस्थानकात सुरू करण्यात आलेल्या नव्या केंद्राला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक पातळीवरच ही सुविधा उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची केंद्रावर मोठी गर्दी होत असून, देवरुखला जावे लागत नसल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी देवरुख येथील केंद्रावर जावे लागत होते. त्यामुळे प्रवासासाठी अतिरिक्त वेळ आणि खर्च करावा लागत होता. त्यातच देवरुख येथील केंद्रावर होणारी गर्दी आणि मर्यादित वेळेमुळे अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही कार्ड न मिळाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागत होते.
सध्या पावसाळा आणि शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी व कष्टकरी वर्गासाठी एका कार्डासाठी संपूर्ण दिवस खर्च करणे अवघड ठरत होते. मात्र, संगमेश्वर एसटी स्थानकातच ही सुविधा सुरू झाल्याने नागरिकांचा वेळ आणि पैशांची बचत होत असून, या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. संगमेश्वर शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी केंद्रावर येत आहेत. शासनाने निश्चित केलेल्या १९९ रुपयांच्या अधिकृत शुल्कात हे कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे.
हे केंद्र सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत कार्यरत असून गुरुवार आणि रविवार वगळता आठवड्यातील इतर सर्व दिवशी सेवा उपलब्ध आहे. स्थानिक स्तरावर सुरू झालेल्या या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून, विशेषतः पावसाळ्यातील प्रवासाची कटकट कमी झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

