(पुणे / वृत्तसंस्था)
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळाले असून, कटाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी माहिती लागली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यानंतर चेतनचा जवळचा मित्र रितेश हांडे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.म्हणजेच केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी तब्बल ७९ दिवसांनी तिसरी अटक झाली आहे. न्यायालयाने रितेश हांडे याला १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि चेतन चौधरी हे या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. दोघांनी नियोजनपूर्वक केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. चेतन चौधरी सुरुवातीपासूनच या प्रकरणाची माहिती आपला मित्र रितेश हांडे याला देत होता. केतन अग्रवाल यांची हत्या झाल्यानंतर चेतनने रितेशची भेट घेऊन घडलेला प्रकार त्याला सांगितल्याचेही तपासात समोर आले आहे.
रितेश हांडे याचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे अनेक जबाबांमधून तसेच तांत्रिक पुराव्यांतून समोर आले. तपासादरम्यान चेतन चौधरीनेही रितेशबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सुरुवातीच्या टप्प्यात रितेशला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्याने पोलिसांना सहकार्य केले; मात्र तपास पुढे गेल्यानंतर या प्रकरणातील त्याचा सहभाग समोर आल्याने त्याला अटक करण्यात आली.
कोणत्याही आरोपीला अटक करण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर आधार आणि पुरावे असणे गरजेचे असल्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल यांनी स्पष्ट केले. तपासादरम्यान नोंदवण्यात आलेले जबाब आणि उपलब्ध तांत्रिक पुरावे यांच्या आधारे रितेश हांडे याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन आणि सियाने रचलेल्या संपूर्ण कटाची माहिती रितेशला आधीपासूनच होती. १८ जून रोजी केतनला संपवण्याच्या उद्देशाने चेतन आणि सियाने रितेशलाही लोहगडावर सोबत येण्यास सांगितले होते. मात्र, त्याने प्रत्यक्ष लोहगडावर जाणे टाळले. गुन्हा घडल्यानंतरही रितेश आरोपींच्या सातत्याने संपर्कात होता. या प्रकरणातील आपला सहभाग लपवण्यासाठी त्याने चेतनसोबत झालेले व्हॉट्सॲपवरील संभाषण डिलिट केले होते. मात्र, सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलिसांनी हे चॅट्स रिकव्हर केल्यानंतर रितेशचा सहभाग उघड झाला.
अटक करण्यात आलेला रितेश हांगे हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तिघेही एकाच वर्गात शिकले असल्याने त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती.
दरम्यान, केतन अग्रवाल यांची हत्या झाली त्यावेळी रितेश हांडे प्रत्यक्ष लोहगडावर उपस्थित होता का, तसेच चेतन चौधरीच्या आधी तो गडावर पोहोचला होता का, याबाबत अजूनही तपास सुरू आहे. घटनेच्या वेळी लोहगडावर उपस्थित असलेल्या काही नागरिकांचे जबाबही पोलिसांनी नोंदवले आहेत. या हत्याकांडात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पुणे ग्रामीण पोलीस तपास करीत आहेत.


