(संगमेश्वर / एजाज पटेल)
फुणगूस खाडीपट्ट्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. सतत बदलणारे हवामान, मोहोर जळणे आणि फलधारणा गळती यांसारख्या संकटांचा सामना करत असतानाच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे उरलीसुरली आशाही संपुष्टात आली आहे.
फुणगूससह कोंडये, मांजरे, मेढे, डावखोल, परचुरी, देण, उपळे या दशक्रोशीतील गावांसह जाकादेवी आणि डिंगणी परिसराला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तयार अवस्थेतील आंबा मोठ्या प्रमाणावर गळून पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडेही कोलमडली आहेत. त्यामुळे संपूर्ण खाडीपट्ट्यातील बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.
निसर्गाच्या या संकटानंतर शासन आणि प्रशासनाकडून अपेक्षित तत्परता न दिसल्याने बागायतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पंचनामे आणि मदतकार्याबाबत प्रशासनाची उदासीन भूमिका असल्याचा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, या गंभीर परिस्थितीची दखल घेत कोंडये गावचे सरपंच तसेच शिवसेना (शिंदे गट) कसबा गट विभाग प्रमुख महेश देसाई यांनी बाधित बागायतदारांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. महेश देसाई हे पालकमंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जात असल्याने त्यांच्या हस्तक्षेपाकडे आता बागायतदारांचे लक्ष लागले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना महेश देसाई म्हणाले, “निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बागायतदारांच्या नुकसानीकडे प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत दुर्दैवी आहे. बागायतदार हा या मातीचा कणा असून त्याला संकटात एकटे सोडले जाणार नाही. या घटनेची माहिती मिळताच महसूल आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी करणार आहोत.”
ते पुढे म्हणाले, “केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कृती व्हावी, यासाठी आम्ही प्रशासनाला थेट बागायतदारांच्या बांधावर घेऊन जाणार आहोत. प्रत्येक बाधित शेतकऱ्याचा अचूक पंचनामा होईल यासाठी आम्ही स्वतः लक्ष देणार आहोत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शासनाकडे नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू.”
“पंचनाम्यापासून ते प्रत्यक्ष मदत बागायतदारांच्या हातात मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू. कोणत्याही बागायतदाराने खचून जाऊ नये. पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असेही महेश देसाई यांनी स्पष्ट केले.
महेश देसाई यांच्या या पुढाकारामुळे खाडीपट्ट्यातील बाधित आंबा बागायतदारांमध्ये मदतीबाबत नव्याने आशा निर्माण झाली आहे.

