( संगमेश्वर / मकरंद सुर्वे )
चिपळूण तालुक्यातील असुर्डे येथील श्री स्वामी शंकर नाथ प्रतिष्ठान या जागृत देवस्थानात यंदाही गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
दि. १० जुलै २०२५ रोजी पहाटे पाच वाजता स्वामींच्या पादुकांवर दुग्धाभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर स्वामींची महापूजा, महाआरती, अखंड नामस्मरण, महायज्ञ आणि रात्रभर चालणारे नामसंकिर्तन व आरती आयोजित करण्यात आली होती.
या पावन कार्यक्रमात सुमारे १२०० हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला. महिलावर्ग, वृद्ध, लहान मुले तसेच तरुण भक्तमंडळींच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री स्वामी समर्थ शंकरनाथ प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव अत्यंत भाविकतेने आयोजित केला जातो. दर गुरुवारी नामस्मरण व महाआरती होणारे हे स्थान जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील असंख्य भक्तांसाठी श्रद्धास्थान ठरले आहे.