(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील करंबेळे गावाच्या सीमेनजीक देवरुख–संगमेश्वर राज्य मार्गावर गुरुवारी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास रिक्षा मोरीवरून घसरून सुमारे दहा फूट खोल पऱ्यात कोसळल्याची घटना घडली. या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात सई लिंगायत (वय ३०) आणि रेश्मा लिंगायत (वय ५५, दोघी रा. शिवने, ता. संगमेश्वर) या जखमी झाल्या आहेत. साईप्रसाद लिंगायत हे आपल्या आई व पत्नीसह रिक्षा (एम.एच. ०८, ए.क्यू. ७९७७) घेऊन शिवने येथून देवरुखच्या दिशेने प्रवास करत होते. करंबेळे परिसरात पोहोचताच रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट मोरीवरून खाली पऱ्यात कोसळले.
अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रवासातील दोन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमींना तातडीने देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती लक्षात घेता अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती देवरुख ग्रामीण रुग्णालयातून देण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ देवरुख–संगमेश्वर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताचे नेमके कारण तपासण्यासाठी देवरुख पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

