(रत्नागिरी / प्रतिनिधी)
किरकोळ कारणातून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत पाच जण जखमी झाले असून, दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. एका तक्रारीनुसार १४ जणांविरुद्ध, तर दुसऱ्या तक्रारीनुसार चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील आरे येथे शनिवारी (५ सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी रविवारी (६ सप्टेंबर) पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरे येथे शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. वाद वाढत गेल्याने दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. या घटनेत प्रसाद कदम, पूर्वा कदम, पंकज कदम, प्रतीक्षा कदम आणि अस्मिता पेडणेकर हे पाच जण जखमी झाले. या प्रकरणी प्रसाद कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अस्मिता पेडणेकर यांनी दिलेल्या स्वतंत्र फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच घटनेप्रकरणी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांसमोर आता नेमका वाद कशामुळे आणि कोणत्या कारणावरून वाढला, याचा तपास करण्याचे आव्हान आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.


