(संगमेश्वर / प्रतिनिधी)
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने व्यापारी पैसा फंड संस्था संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेले नेत्रचिकित्सा शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचा लाभ विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील ग्रामस्थांनी घेतला.
शिबिरात डोळ्यांच्या विविध आजारांची तपासणी, दृष्टी परीक्षण तसेच चष्म्याची आवश्यकता असलेल्या लाभार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी जिजाऊ संस्थेच्या वैद्यकीय पथकातील डॉ. कल्पेश आपटे, डॉ. अनिकेत माणकापुरे, दीप्ती सावंत, शिवानी लिंगायत, सिद्धेश सावंत यांनी सेवा दिली. तसेच संगमेश्वर तालुका जिजाऊ टीम प्रमुख राजेश धामणे, श्वेता पवार, मनोज पांचाळ, व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये, सदस्य रमेश झगडे, पर्यवेक्षक प्रकाश दळवी आणि प्रशालेचे कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी प्रास्ताविक करत शिबिरामागील उद्देश स्पष्ट केला. व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे कौतुक केले. तसेच संस्थेने प्रशालेत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित केल्याबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी धनंजय शेट्ये व रमेश झगडे यांच्या हस्ते वैद्यकीय पथकाचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तर अन्य सहकाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिन देव खामकर आणि पर्यवेक्षक प्रकाश दळवी यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे आभार मानले.

