(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी येथील खारेघाट रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आणि एटीएममध्ये दिव्यांगांसाठी उभारण्यात आलेले रॅम्प मानकांनुसार नसल्याने दिव्यांगांसह ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य ग्राहकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा आरएचपी फाउंडेशनने उपस्थित केला आहे. यासंदर्भात शाखा व्यवस्थापक मधुरा नाईक यांना निवेदन देत तातडीने आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
आरएचपी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शाखेची पाहणी केली असता, मुख्य प्रवेशद्वारावरील रॅम्पसमोरच भिंत असल्याने त्याचा प्रत्यक्ष वापर करणे शक्य नसल्याचे निदर्शनास आले. तसेच एटीएममधील रॅम्पची रचनाही दिव्यांगांसाठी सुलभ नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सुलभ आणि समान प्रवेशाचा अधिकार आहे. मात्र, सद्यस्थितीतील रॅम्प हे निर्धारित मानकांशी विसंगत असल्याने दिव्यांगांच्या हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप फाउंडेशनने केला आहे. याबाबत तातडीने दुरुस्ती न झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून न्याय मागण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला. यावर शाखा व्यवस्थापक मधुरा नाईक यांनी प्रतिनिधींची बाजू समजून घेत दिव्यांगांसाठी सुलभ, सुरक्षित आणि मानकांनुसार नवीन रॅम्प उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी आरएचपी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे, सदस्य समीर नाकाडे, शकिरा कुरेशी, दिव्यांग जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष संजय सुर्वे, उपाध्यक्ष किरण धनावडे, तसेच चिपळूण दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष अशोक भुस्कुटे आणि सदस्य अमृता भुस्कुटे उपस्थित होते.

