(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील शिवधामापूर, भेलेवाडी येथे जमीन मोजणीदरम्यान निर्माण झालेल्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सात जणांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी देविदास बचन महाडीक (वय ५४, सध्या रा. शिंदे चाळ, पाग नाका, चिपळूण, मूळ रा. शिवधामापूर, भेलेवाडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संभाजी पांडुरंग महाडीक, उमेश संभाजी महाडीक, अमेय संभाजी महाडीक, सदाकर गणपत महाडीक, राजाराम बाबी महाडीक, राजेंद्र शिवराम खेडेकर आणि रुपेश राजेंद्र खेडेकर (सर्व रा. शिवधामापूर, भेलेवाडी) या सात जणांविरुद्ध गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. घटनास्थळी, फिर्यादी देविदास महाडीक यांच्या घराशेजारील गट क्रमांक १६६/३ या शेजारील जमिनीची मोजणी सुरू होती. मोजणीसंदर्भात कोणतीही नोटीस न मिळाल्यामुळे देविदास महाडीक आणि त्यांच्या बहिणींनी मोजणी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. मात्र, या विचारण्याचा राग आल्याने आरोपींनी एकत्र येत संगनमताने गैरकायद्याची गर्दी जमवली.
या वादाच्या पार्श्वभूमीवर, आरोपी क्रमांक १ आणि २ यांनी देविदास महाडीक यांना काठीने डोक्यावर आणि हातावर मारहाण केली. त्यानंतर जमिनीवर पाडून इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी व हाताने जबर मारहाण केली. इतकेच नव्हे तर, आरोपी क्रमांक २ याने फिर्यादी व साक्षीदाराला “दिसाल त्या ठिकाणी खल्लास करू” अशी उघड धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ११८ (१), ११५ (२) आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.