(चिपळूण / निलेश कोकमकर)
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन बंधारे अभियान २०२६-२७’ला चिपळूण तालुक्यातील कळंबट येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती चिपळूण आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत कळंबट येथील गडग्याच्या पऱ्यावर दोन बंधारे उभारण्यात आले.
राज्यात पावसाने दडी मारल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, त्याचा परिणाम शेतीसह नद्या, पऱ्या आणि नाल्यांमधील पाणीसाठ्यावर होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि पावसाचे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरत आहेत.
कळंबट येथे राबविण्यात आलेल्या या उपक्रमात कुणबी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्रुप ग्रामपंचायत कळंबट-केरे-घवाळेगावचे सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थ यांनीही बंधाऱ्यांच्या उभारणीसाठी सहकार्य केले.
या अभियानात कळंबट हायस्कूलचे शिक्षक महेंद्र शिरकर, सतीश जाधव, संतोष बळकटे, रवींद्र कोकमकर, सौ. साळुंके मॅडम, प्रशांत पोवार, सीताराम बारगोडे, भुवड सर आणि कल्पेश कोकमकर यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच ग्रामस्थ बबन गमरे, सुधाकर केळकर, शरद शिरकर, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका मंजू कोकमकर, छाया घवाळे, अलका लिंगायत आणि आरोग्य सेविका यांनीही योगदान दिले.
पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून ठेवल्याने भूजलपातळी वाढण्यास आणि परिसरातील पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. या उपक्रमातून विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांमध्ये जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण होण्यासही हातभार लागला आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत कळंबट ग्रामस्थांनी लोकसहभागातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्न किती महत्त्वाचे आहेत, हे या उपक्रमातून दिसून आले.


