(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यात भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) मोबाईल आणि फायबर नेटवर्कने मागील आठवड्यापासून अक्षरशः दांडी मारली आहे. त्यामुळे शासकीय कामकाजासह सर्वसामान्य नागरिकांचे रोजचे व्यवहार ठप्प झाले असून, तालुकावासीय प्रचंड गैरसोयीचा सामना करत आहेत.
ग्रामीण भागांमध्ये खासगी मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क नसल्यानं नागरिकांची अवलंबूनता बीएसएनएलवरच आहे. मात्र, या एकमेव पर्यायाचीही सेवा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांचे जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. मोबाईल कॉल, इंटरनेट वापर, शासकीय कार्यालयांचे ऑनलाईन व्यवहार, बँकिंग, शिक्षण, आरोग्य अशा सर्व क्षेत्रांवर याचा थेट परिणाम झाला आहे. ग्राहकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही बीएसएनएलकडून कोणतीही ठोस कार्यवाही न होता केवळ छापील आणि औपचारिक उत्तरे दिली जात आहेत. “सध्या देखभाल सुरू आहे”, “तांत्रिक बिघाड आहे” अशा जुजबी उत्तरांनी नागरिकांचा संताप अधिकच वाढला आहे.
मोबाईल सेवा ही सध्याच्या युगातील अत्यावश्यक गरज असताना बीएसएनएलच्या सेवेला लागलेले हे ‘ग्रहण’ आणि स्थानिक प्रशासनाची उदासीनता यामुळे जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. “सरकारी सेवा जर अशी ठप्प राहिली, तर ग्रामीण भागातील डिजिटल इंडिया स्वप्नातच राहील,” अशी बोचरी टीका नागरिकांनी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि बीएसएनएल विभागाने तातडीने जागे होऊन सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.