(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यात एसटी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संगमेश्वर-करजुवे (कडवई मार्गे) धावणारी एसटी बस गेल्या चार ते पाच दिवसांपासून ठरलेल्या किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी मार्गाऐवजी थेट कडवईकडे जात असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत होती. अखेर गुरुवारी संतप्त विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांनी तुरळ फाट्यावर बस अडवून ती पूर्ववत मार्गावर चालविण्याची मागणी केली.
संगमेश्वरहून कडवई मार्गे करजुवेकडे जाणारी ही बस किंजळकरवाडी व ओकटेवाडी येथून नियमितपणे धावत असते. या परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी पूर्णपणे याच बसवर अवलंबून आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बसने हा मार्ग टाळल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. अनेकांना दररोज लांब अंतर पायी चालावे लागत होते, तर काहींना खासगी वाहनांसाठी अतिरिक्त खर्च करावा लागत होता.
नेहमीप्रमाणे गुरुवारी बस तुरळ फाट्यावर पोहोचताच विद्यार्थी, ग्रामस्थ आणि प्रवाशांनी बस थांबवली. चालक व वाहक यांना बस पूर्वीप्रमाणे किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी मार्गे नेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, त्यांनी नकार दिल्याने उपस्थितांचा संताप अनावर झाला आणि ग्रामस्थांनी बस पुढे जाऊ दिली नाही.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी तातडीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. बस तत्काळ पूर्ववत मार्गावर सुरू करण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
थेराडे यांच्या हस्तक्षेपानंतर एसटी प्रशासनाने तातडीने चालक-वाहकांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित बस किंजळकरवाडी आणि ओकटेवाडी मार्गे पूर्ववत धावू लागली. त्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या आंदोलनावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय कुवळेकर, संजय उजगावकर, रवींद्र कुवळेकर, संजय कुवळेकर, नवनाथ उजगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, प्रवासी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय कुवळेकर यांनी इशारा देताना सांगितले की, “एसटी प्रशासनाने भविष्यात पुन्हा अशा प्रकारे ठरलेला मार्ग बदलून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले, तर ग्रामस्थांच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

