(देवळे / वार्ताहर)
मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून साखरपा विभाग पत्रकार संघटनेतर्फे संगमेश्वर तालुक्यातील कनकाडी येथील युवा चित्रकार सागर प्रदीप जाधव यांना ‘युवा प्रेरणा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पंचक्रोशीतील युवकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुरस्कार दरवर्षी कला, क्रीडा, साहित्य, इतिहास आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांना दिला जातो. यंदा या पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे.
यावर्षीच्या पुरस्कारासाठी कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील युवा चित्रकार सागर जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. सागर जाधव हे मुंबईतील वसंतदादा पाटील महाविद्यालयात बीएफएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. त्यांनी आजवर जलरंग, अॅक्रेलिक आणि ऑइल रंग माध्यमांतून विविध कलाकृती साकारल्या आहेत. कॅनव्हास, ऑइल पेपर आणि हँडमेड पेपर अशा विविध माध्यमांवर त्यांनी काम केले असून दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांची रचना करण्याचाही त्यांना अनुभव आहे.
प्रदर्शक आर्ट्स गॅलरीमध्ये झालेल्या प्रदर्शनात त्यांच्या निसर्गचित्रांची निवड झाली होती. केडी आर्ट नॅशनल कॉम्पिटिशन तसेच राज्यस्तरीय पोस्टर मेकिंग स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली होती. विद्यापीठाच्या युथ फेस्टिव्हलमध्ये त्यांनी रौप्यपदक मिळवले असून बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या नामांकित संस्थेच्या प्रदर्शनात त्यांच्या चित्रांचा सहभाग राहिला आहे. यंदाच त्यांनी साकारलेल्या संगमेश्वर तालुक्यातील विविध स्थळांच्या चित्रांची नेहरू सेंटर येथे भरलेल्या प्रदर्शनासाठी निवड झाली होती. सागर जाधव यांची चित्रे अमेरिका आणि इंग्लंडमध्येही विकली गेली आहेत.
कनकाडी येथील वरची गुरववाडी शाळेत झालेल्या कार्यक्रमात सागर जाधव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी गावाचे सरपंच संतोष गोताड, तिवरे-मेढे येथील उद्योजक विष्णुशेट रामाणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेटये, आबा सावंत, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पंदेरे, पोलीस पाटील, शाळेचे मुख्याध्यापक रूपेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शिक्षक मुकुंद वाजे, शिक्षिका प्रतिभा घाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गुरव, विलास सुकम आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम साखरपा विभाग पत्रकार संघटनेचे पत्रकार प्रकाश चाळके, अमित पंडित, शंकर वैद्य, रमेश शिंदे आणि संतोष पोटफोडे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या रेवती पंडित यांनी केले, तर आभार प्रदर्शन पत्रकार प्रकाश चाळके यांनी केले.

