(खेड/ रत्नागिरी प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील भेलसई येथे पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी एका महिलेला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तक्रार मागे घेतली नाही तर ग्रामपंचायतीतील नोकरीवरून काढून टाकू, ग्रामसभेत बदनामी करू, तसेच कुटुंबीयांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या घरी असताना प्रमोद पांडुरंग कदम, शंकर गणू धाडवे, विजय संभाजी कदम, आनंद शंकर कदम, अशोक रामचंद्र कदम, कृष्णा नाना कदम, संदीप गोविंद कदम, विनोद यशवंत कदम आणि भार्गव नाना कदम यांनी तिच्या घरात विनापरवानगी प्रवेश केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपींनी फिर्यादीवर प्रमोद कदम याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार तातडीने मागे घेण्यासाठी दबाव टाकला. तक्रार मागे न घेतल्यास ग्रामपंचायत भेलसई येथील नोकरी गमवावी लागेल, असा इशारा देण्यात आला. तसेच सर्वांसमक्ष आक्षेपार्ह वक्तव्य करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
याच प्रकरणात दुसऱ्या दिवशी, २२ जून रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादीला कृष्णा कदम यांच्या घरी बोलावण्यात आले. तेथेही तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत, “तुझ्या कुटुंबीयांना बघून घेऊ, तू नोकरीवर कशी येते ते पाहतो,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय ग्रामसभेत बदनामी करण्याची धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिलेने खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १८९(२), १९०, ३२९(४) आणि ३५२(२) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

