(खेड / वार्ताहर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी बोगद्यानजीक गुरुवारी (२३ जुलै) सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास अमोनिया गॅस वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने टँकरमधून कोणतीही गॅसगळती झाली नसल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथून लोटे एमआयडीसीतील प्रेरणा केमिकल्स कंपनीकडे अमोनिया गॅस घेऊन जाणारा टँकर कशेडी बोगद्यानजीक आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर डिव्हायडरवर आदळून रस्त्यावर पलटी झाला.
टँकरमध्ये अमोनिया गॅस असल्याने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत टँकरची तपासणी केली असता कोणतीही गॅसगळती झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्रशासनासह स्थानिक नागरिकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.
अपघातात चालक प्रेमप्रकाश भस्कळ पटेल यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेच्या दृष्टीने परिसराची पाहणी करण्यात आली तसेच लोटे एमआयडीसीतील संबंधित कंपनीचे सेफ्टी अधिकारी आणि प्रतिनिधीही घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, अपघातामुळे कशेडी बोगद्यातील एका मार्गिकेवरील वाहतूक काही काळ बंद ठेवून दुसऱ्या मार्गिकेतून नियंत्रित पद्धतीने सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती..

