(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्वयंभू शिवस्थान आणि उपज्योतिर्लिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी झाली. विशेषतः श्रावणी सोमवारनिमित्त राज्याच्या विविध भागांतून हजारो शिवभक्त दर्शनासाठी दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्त ठेवला.
श्रावणातील सर्व सोमवारी केलेल्या नियोजनबद्ध बंदोबस्ताबद्दल मार्लेश्वर देवस्थानतर्फे पोलीस दलाचे आभार मानण्यात आले. चौथ्या श्रावणी सोमवारी उपविभागीय पोलीस उपअधीक्षक सुरेश कदम आणि देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी श्री क्षेत्र मार्लेश्वरला सदिच्छा भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली. श्रावण महिन्यातील वाढती भाविकसंख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान प्रभावीपणे हाताळल्याबद्दल देवस्थानच्या वतीने सुरेश कदम आणि राजेंद्र यादव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भाविकांची सुरक्षितता आणि दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेने घेतलेल्या दक्षतेचे यावेळी कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी मारळचे पोलीस पाटील देवदास सावंत, देवस्थान समितीचे रवींद्र गुरव, नंदकुमार गुरव, संदीप लिंगायत, अमित लिंगायत, रुपेश सावंत, गणेश लिंगायत, शैलेश पवार यांच्यासह देवस्थानचे कर्मचारी आणि भाविक उपस्थित होते. भाविकांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या सोयी-सुविधांसाठी देवस्थान समितीने केलेल्या नियोजनाचेही पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याचे लक्षात घेऊन समितीने केलेले व्यवस्थापन शिस्तबद्ध आणि प्रभावी ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. पोलीस दल आणि देवस्थान समिती यांच्यातील समन्वयामुळे श्रावणी मेळाव्याच्या काळात गर्दीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था आणि भाविकांची सुरक्षितता यांचा समतोल साधता आला. परिणामी, श्रावणी मेळावा उत्साही आणि सुरक्षित वातावरणात पार पडला.


