( विशेष /प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे आंदोलनाचे वार्तांकन करत असताना दूरदर्शन प्रतिनिधी दिपक भागवत यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी अखेर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, १० ते १५ जणांविरुद्ध कठोर कलमांखाली कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट घाला घालणाऱ्या या घटनेमुळे जिल्हाभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिपळूणमधील चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते रुपेश पवार यांनी बहादूरशेख नाका येथे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी दीपक भागवत आपल्या कॅमेरामनसह घटनास्थळी पोहोचले होते. आंदोलनस्थळी वादाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष घडामोडी कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात होताच काही जणांनी पत्रकारांवरच धाव घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार, “तु कसला पत्रकार, तु कसले शूटिंग करतोस,” अशी दमदाटी करत १० ते १५ जणांनी पत्रकार भागवत यांना धक्काबुक्की केली, त्यानंतर हाताच्या थपडा, लाथाबुक्क्यांनी तोंडावर, छातीवर, चेहऱ्यावर आणि पाठीवर मारहाण करून खाली पाडले. पहिल्या हल्ल्यानंतर ते रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेले असतानाही संबंधितांनी पुन्हा पाठलाग करून दुसऱ्यांदा मारहाण केल्याचा गंभीर आरोप नोंदवण्यात आला आहे.
हल्लेखोरांना पत्रकार असल्याचे स्पष्ट माहित असतानाही कोणतीही भीड न बाळगता उघडपणे मारहाण करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. या गोंधळात पत्रकार भागवत यांची साइड बॅग, ओळखपत्र, मोबाईल आणि इतर साहित्यही गायब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे हा गुंडशाहीचा प्रकार केवळ मारहाणीपुरता मर्यादित नसून पत्रकारांना वार्तांकन रोखण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे. या हल्ल्यात भागवत यांच्या डोक्याला आणि शरीराच्या विविध भागांना दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संतापजनक घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ अंतर्गत कलम ४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे 115(2), 189(2), 190, 191(2), 303(2), 351(2), 351(3) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. यामुळे पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. पत्रकारावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा अत्याचार नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर उघडपणे चालवलेला दबाव मानला जात आहे. निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या दीपक भागवत यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला होणे म्हणजे सत्य दडपण्याचा प्रयत्न असल्याची भावनाही पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे.

