(रत्नागिरी /प्रतिनिधी)
राज्याच्या १२ नॉटिकल मैलांच्या सागरी हद्दीत मासेमारीस परवानगी नसतानाही पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी करणाऱ्या चार मिनी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली. काळबादेवी किनाऱ्यासमोर सुमारे ४ ते ५ नॉटिकल मैल अंतरावर रविवारी (६ सप्टेंबर) ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी शिवराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ‘शारदा’ गस्ती पथकाने ही कारवाई केली. पकडण्यात आलेल्या चार नौकांपैकी तीन नौका मिरकरवाडा येथील, तर एक नौका काळबादेवी येथील आहे. मिरकरवाडा येथील सर्फराज पावसकर यांची ‘रिया-सारिया’, अस्लम दर्वे यांची ‘उबेदुल्ला अदनान’, मुस्सदीक जयगडकर यांची ‘आयरा ड्रौनाब’ आणि काळबादेवी येथील धनंजय बिर्जे यांची ‘ध्रुवी’ या नौकांवर कारवाई करण्यात आली.
पर्ससीन नेट मासेमारीचा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. राज्यातील सुमारे ३०५ पर्ससीन नौकांना केवळ ‘ ॲक्सेस पास’ देण्यात आले असून, त्यांना १२ नॉटिकल मैलांच्या बाहेर मासेमारी करण्याची परवानगी आहे. मात्र, काही नौका सागरी हद्दीतील नियमांचे उल्लंघन करून १२ नॉटिकल मैलांच्या आतील भागात मासेमारी करत असल्याच्या तक्रारी पारंपरिक मच्छीमार नेत्यांकडून करण्यात आल्या होत्या. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मत्स्य विभागाने समुद्रातील गस्त वाढविली आहे.
राज्याच्या सागरी हद्दीत नियमबाह्य पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक मत्स्य आयुक्त जे. डी. सावंत यांनी दिला आहे. समुद्रातील हालचालींवर विभागाची करडी नजर राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचा मुद्दा यापूर्वीही मच्छीमार नेत्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे निर्धारित सागरी हद्दीचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर मत्स्य विभागाच्या कारवाईकडे मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.


