(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कुर्धे येथील पुलाच्या बांधकामादरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आवश्यक प्रशासकीय मंजुरी, निविदा प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर नसताना काम सुरू झाल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यान उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामावेळी काँक्रीटचा भाग कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमागे केवळ निष्काळजीपणा नसून प्रशासकीय बेफिकिरी आणि नियमांची उघड पायमल्ली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यासंदर्भातील निवेदन तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांना सादर केले. निवेदनात, “अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया किंवा अधिकृत वर्क ऑर्डर नसताना काम सुरू करण्याचे धाडस संबंधित ठेकेदाराने नेमके कोणाच्या आशीर्वादाने केले?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
शिवसेनेने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करताना जिल्ह्यात काही ठिकाणी मंजुरीपूर्वीच कामे सुरू करून नंतर निधी मंजूर करून घेण्याची विकृत पद्धत रुजत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा प्रकारे नियमांना हरताळ फासून सुरू करण्यात येणाऱ्या कामांमुळे केवळ सरकारी निधीची लूट होत नाही, तर निष्पाप नागरिकांच्या जीवाशीही खेळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात संबंधित ठेकेदाराचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याबरोबरच, या प्रकारात कोणत्याही अधिकाऱ्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कठोर शिस्तभंगात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनी प्रशासनाला इशारा देताना, “दुर्घटनेतील दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. एका व्यक्तीचा जीव गेल्यानंतरही जबाबदारांवर कारवाई होत नसेल, तर तो प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा कळस ठरेल,” असे स्पष्ट केले. कुर्धे दुर्घटनेने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतलेला नाही, तर जिल्ह्यातील विकासकामांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येते की तेही कागदोपत्री चौकशीच्या गर्तेत हरवते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

