(रत्नागिरी /प्रतिनिधी)
अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या जात प्रमाणपत्रांबाबत होणारी कथित अन्यायकारक कार्यवाही, तसेच विविध प्रशासकीय निर्णयांविरोधात ‘ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन’ (ऑफ्रोह) संघटनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. सोमवारी (७ सप्टेंबर) झालेल्या या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी आवाज उठविला. आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यासाठीचे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे सादर करण्यात आले.
अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्रांबाबत लबाडी किंवा फसवणुकीच्या आधारे प्रमाणपत्रे अवैध ठरविण्याच्या प्रक्रियेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप ‘ऑफ्रोह’ने केला. जात वैधता प्रमाणपत्राची ‘सु-मोटो’ म्हणजेच स्वतःहून फेरतपासणी करण्याची प्रक्रिया थांबवावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली. तसेच २२ जुलै २०२६ रोजीच्या राजपत्रातील ‘जात प्रमाणपत्र (सुधारणा) कायदा-२०२६’ रद्द करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. ४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार सेवाखंडाचा कालावधी सेवाकालावधीत समाविष्ट करून संबंधित कर्मचाऱ्यांना पूर्ण निवृत्तीवेतन मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली. विलंबाने जात वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीचे लाभ देण्यात यावेत, असेही संघटनेने म्हटले आहे. २८ सप्टेंबर २०२५ चे परिपत्रक रद्द करून अनुकंपा नियुक्ती तसेच १०, २० आणि ३० वर्षांच्या आश्वासित प्रगती योजनेचे लाभ पुन्हा लागू करावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
अधिसंख्य पदावर वर्ग होण्यापूर्वी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच नियम ४.२ आणि ‘परिशिष्ट-ड’नुसार अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतनवाढ देऊन सुधारित वेतन निश्चिती करावी, अशी मागणीही संघटनेने केली. या आंदोलनात ‘ऑफ्रोह’चे राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उषाताई पारशे, कार्याध्यक्ष राजकन्या भांडे व बापुराव रोडे, उपाध्यक्ष सुनंदाताई फुकट, सचिव हेमराज सोनकुसरे, कोषाध्यक्ष सतीश घावट, माजी उपाध्यक्ष सिंधुताई सनगळे यांच्यासह सुरेखा घावट, श्रीकृष्ण भांडे, संगिता रामागडे, विलास घावट, दादाजी बच्छाव, अरुण बावीस्कर, देवकीनंदन सपकाळे, पद्माकर पवार, पंडित सोनवणे, बंडू चेचरे आणि वंदना चेचरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.


