(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील एस. एन. कानडे आयडियल हायस्कूल, देवळे येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रकाश सिताराम कदम यांच्या सेवापूर्ती व सदिच्छा समारंभाचे आयोजन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. शाळेत ‘भाऊ कदम’ या नावाने परिचित असलेल्या प्रकाश कदम यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेला यावेळी गौरविण्यात आले.
प्रकाश कदम हे आपल्या सुंदर हस्ताक्षर, निष्कलंक चारित्र्य, मनमिळावू स्वभाव आणि विद्यार्थ्यांशी प्रेमळ वागणुकीमुळे शाळेतील शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय होते. सेवाकाळात शाळेच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा यावेळी विविध मान्यवरांनी गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.
या समारंभाला संस्थेचे अध्यक्ष निलेश कोळवणकर, कार्यवाह प्रबोध आटले, संस्था सदस्य यशवंत घागरे, प्रकाश चाळके, संतोष परशेटये, उत्सवमूर्ती तथा माजी सरपंच सौ. प्राची प्रकाश कदम, प्रकाश कदम यांच्या मातोश्री तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या वतीने अध्यक्षांच्या हस्ते प्रकाश कदम यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याध्यापिकांच्या हस्ते शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांना भावपूर्ण शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांनी आपल्या मनोगतातून प्रकाश कदम यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या निरोगी, सुखी आणि आनंदी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद गार्डी यांनी केले.

