(पालघर / वृत्तसंस्था)
पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः बोईसर, तलासरी आणि डहाणू तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक भाग जलमय झाले आहेत. रस्त्यांचे अक्षरशः नद्यांमध्ये रूपांतर झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घरातच अडकून पडावे लागले. दरम्यान, बोईसरमधील भीमनगर परिसरात गुरुवारी पूराच्या पाण्यात अडकलेल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याची स्थानिकांनी थरारक पद्धतीने सुखरूप सुटका केली, तर डहाणूमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एसटी बसमधील सर्व प्रवाशांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
बोईसरमध्ये रस्ते झाले नदीसारखे; दोन महिन्यांच्या बाळाचा थरारक रेस्क्यू
बोईसरमधील भीमनगर परिसरात मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले. परिसरातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने अनेक कुटुंबे घरात अडकून पडली. या कुटुंबांमध्ये अवघ्या दोन महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. स्थानिक तरुणांनी धाडस दाखवत प्रथम बाळाला प्लास्टिकच्या संरक्षक आवरणात सुरक्षित गुंडाळले. त्यानंतर कंबरेएवढ्या पाण्यातून त्या चिमुकल्याला हातात घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. बाळ सुरक्षित बाहेर आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बचावकार्यात स्थानिक युवकांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तलासरीत काळू नदीला पूर; 35 नागरिकांची सुखरूप सुटका
दरम्यान, तलासरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे काळू नदीला पूर आला. पुराचे पाणी वेगाने वाढल्याने आवरपाडा आणि वाळवीपाडा परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे सुमारे 30 ते 35 नागरिक अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. वाढत्या पाण्याच्या पातळीतही सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
डहाणूत पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सायवन-वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) बस थेट पुराच्या पाण्यात अडकली. बसमध्ये चार प्रवासी, चालक आणि वाहक असे एकूण सहा जण अडकून पडले होते. माहिती मिळताच स्थानिक युवक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोरीच्या साहाय्याने सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे पुराच्या पाण्यातून वाहन नेण्याचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
प्रशासन सतर्क; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली असून पूरग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, पूरग्रस्त रस्त्यांवरून वाहन चालवू नये, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. पालघरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम असून, पुढील काही तासही अतिवृष्टीचा इशारा असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे.

