(देवरूख / वार्ताहर)
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज (गुरुवारी) देवरूख शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
मोर्चाची सुरुवात देवरूख पोलीस ठाण्यासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. त्यानंतर मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मातृमंदिर मार्ग, माणिक चौक, बसस्थानक (एसटी स्टँड), स्टेट बँक रोड आणि ग्रामीण रुग्णालय मार्गे पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन विसर्जित करण्यात आला.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी नीट आणि जेईई (JEE) परीक्षांमधील कथित अनियमितता, पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा घटनांची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मोर्चादरम्यान केंद्र सरकारच्या परीक्षा व्यवस्थापनाविरोधात तसेच कथित ढिसाळ नियोजनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे संगमेश्वर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.

