(संगमेश्वर / एजाज पटेल)
मुंबई–गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी चौक ते शास्त्री पूल दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रखडलेल्या महामार्गाच्या कामासोबतच सुट्ट्यांमुळे वाढलेली वाहनांची संख्या यामुळे प्रवाशांना अक्षरशः मरणयातना सहन कराव्या लागल्या.
सोनवी चौकपासून गोवा, मुंबई तसेच देवरुखच्या दिशेने तब्बल पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. इतकेच नव्हे, तर सोनवी चौक–असुर्डे या अंतर्गत मार्गांवरही तितकीच कोंडी झाल्याने संपूर्ण संगमेश्वर परिसर ठप्प झाल्याचे चित्र होते. मे महिन्याच्या कडक उन्हात तासनतास अडकून पडल्याने लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल झाले.
या गंभीर परिस्थितीत महामार्ग पोलिसांची भूमिका सुरुवातीला अत्यंत उदासीन दिसून आली. हजारो वाहनांची गर्दी असताना केवळ एकच पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे दिसले. त्यातच दुपारच्या सुमारास तो कर्मचारीही जागेवर अनुपस्थित राहिल्याने वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला.
दरम्यान, संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी उपलब्ध मनुष्यबळाच्या मर्यादा असतानाही तत्परता दाखवत स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांना मदतीसाठी तैनात केले. मात्र महामार्ग पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ आणि वृत्त समाजमाध्यमे व प्रसारमाध्यमांत झळकताच प्रशासन खडबडून जागे झाले. महामार्ग पोलिसांच्या ढिसाळ नियोजनावर टीका होताच वरिष्ठ स्तरावरून तातडीने हालचाली सुरू झाल्या आणि अवघ्या तासाभरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आला.
आज (शनिवारी) सकाळपासून सोनवी चौक आणि परिसरात महामार्ग पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. योग्य नियोजन आणि पोलिसांच्या उपस्थितीमुळे वाहतूक संथ गतीने का होईना, पण सुरळीत सुरू राहिली. शुक्रवारी निर्माण झालेली बिकट परिस्थिती आज बऱ्यापैकी नियंत्रणात आली.
तथापि, केवळ कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी टाकून हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही, असे प्रवाशांचे मत आहे. या संवेदनशील भागात वाहतूक पोलीस अधिकारी आणि महामार्ग विभागाच्या वरिष्ठांनी स्वतः उपस्थित राहून गस्त घालावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत किमान सुट्ट्यांच्या काळात तरी नियमित गस्त आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

