(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवित गुरुवारी २३ जुलै रोजी रत्नागिरीत हजारो नागरिकांनी भव्य निषेध मोर्चा काढला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने भूमिका घ्यावी, आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा आणि दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईची दखल घ्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंच’च्या पुढाकाराने आयोजित या मोर्चात विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच विविध समाजघटकांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शहरातील प्रमुख मार्गांवर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मोर्चातील उपस्थितीमुळे काही काळ रत्नागिरीत जंतर-मंतर आंदोलनाचीच झलक अनुभवायला मिळत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर घोषणांच्या गजरात मोर्चाने शहरातून मार्गक्रमण करत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चाने प्रस्थान केले. संपूर्ण मोर्चा शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
मोर्चामध्ये सर्व जाती-धर्मांतील नागरिकांचा सहभाग विशेषत्वाने जाणवत होता. विशेष म्हणजे महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. हातात फलक, बॅनर आणि घोषवाक्ये घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह भाजप सरकारच्या विरोधात तसेच जंतर मंतरवरील युवकांच्या मागण्यांना पाठिंबा देणारे नागरिक लोकशाही मार्गाने आपली भूमिका मांडताना दिसून आले. आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे दीर्घकाळ सुरू असलेले उपोषण तातडीने सोडविण्यासाठी सकारात्मक संवाद साधावा तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
मोर्चानंतर झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवर टीका केली. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी बळाचा वापर झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी रत्नागिरी पोलिसांनी मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखताना दाखविलेल्या संयम, सहकार्य आणि समन्वयाबद्दल आयोजकांनी व्यासपीठावरून त्यांचे आभार मानले. एका तरुणीने शिक्षण, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांच्या संरक्षणासाठी अशाच पद्धतीने समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने विचार करून तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
रत्नागिरीतील या ऐतिहासिक भव्य मोर्चाने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत समाजातील विविध घटकांमध्ये निर्माण झालेली जागरूकता आणि लोकशाही मार्गाने भूमिका मांडण्याची भावना अधोरेखित केली. मोठ्या संख्येने नागरिकांनी नोंदविलेल्या सहभागामुळे हा मोर्चा जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील लक्षवेधी लोकशाही आंदोलनांपैकी एक ठरल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
सर्वाधिक लक्षवेधी आणि अभूतपूर्व जनसहभाग
मोर्चाला मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने मोठा ठरला. सुरुवातीला या आंदोलनात काहीशे नागरिक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, मोर्चा सुरू होताच शहराच्या विविध भागांतून विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध राजकीय, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होत गेले. प्रत्येक टप्प्यावर वाढत जाणारी गर्दी पाहून आयोजकांसह प्रशासन आणि उपस्थित नागरिकही काही काळ अवाक झाले. मोर्चा पुढे सरकत असताना सहभागींची संख्या सातत्याने वाढत गेली आणि शहरातील प्रमुख रस्ते आंदोलनकर्त्यांनी अक्षरशः फुलून गेले. घोषणांच्या गजरात, हातात फलक आणि संविधानिक मूल्यांचे संदेश घेऊन चालणाऱ्या हजारो नागरिकांनी या आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळत असल्याचे अधोरेखित केले. रत्नागिरीच्या अलीकडच्या काळातील सर्वाधिक लक्षवेधी आणि अभूतपूर्व जनसहभाग असलेल्या मोर्चांपैकी हा एक मोर्चा ठरल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.

